अपेक्षित भाव नसल्याने हळद उत्पादक संकटात
By admin | Published: May 6, 2017 01:47 PM2017-05-06T13:47:00+5:302017-05-06T13:47:00+5:30
ओली किंवा प्रक्रिया करून सुकवलेल्या हळदीला समाधानकारक भाव नसल्याने शेतक:यांना आर्थिक फटका बसला आहे.
ऑनलाइन लोकमत
शहादा, जि. जळगाव, दि. 6 - शहादा तालुक्यातील कलसाडी, पाडळदा, अलखेड परिसरात हळद पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. ओल्या हळदीवर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असून त्यामुळे परिसरातील मजुरांना रोजगार मिळाला आहे. मात्र ओली किंवा प्रक्रिया करून सुकवलेल्या हळदीला समाधानकारक भाव नसल्याने शेतक:यांना आर्थिक फटका बसला आहे. यावर्षी उत्पादनात घट आली असून आगामी हंगामात हळद पिकाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.
शहादा तालुक्यातील कलसाडी, अलखेड, पाडळदा शिवारात मसालेजन्य हळदीची लागवड करण्यात येते. काही शेतक:यांनी आपल्या क्षेत्रात लागवड केलेल्या हळद पिकाच्या काढणीला सुरुवात केली आहे. ओली हळद बॉयलिंग मशीनद्वारे पॉलिश करणे, सुकविणे आदी कामे पूर्ण करण्यात येत आहेत. यामुळे मजुरांना रोजगार मिळाला आहे. मात्र उत्पादनातील घट व बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हळद बियाणे, मशागत, खते, काढणी व त्यानंतर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा एकरी खर्च यासह एकरी 60 ते 65 हजारांचा खर्च येत असल्याची माहिती कलसाडी येथील हळद उत्पादक शेतकरी पुंजालाल चौधरी यांनी दिली.
ओली हळदीचा भाव नंदुरबार बाजारात मागीलवर्षी एक हजार 300 रुपये प्रती क्विंटल होता. मात्र यावर्षी 700 ते 800 रुपये भाव आहे. सांगली येथे मागीलवर्षी ओली हळद सुकवून व इतर प्रक्रिया केलेल्या हळदीला आठ हजार 500 रुपयांर्पयत भाव होता. यंदा हा भाव सहा ते सात हजारावर असल्याची माहिती शेतक:यांनी दिली. प्रक्रियेनंतर हळद विक्रीसाठी सांगली येथे बाजारपेठ आहे. सांगली येथे हळद विक्रीला नेण्यासाठी एका क्विंटलला सुमारे 200 रुपये वाहतूक खर्च लागतो. एकरी उत्पादन मागीलवर्षी 125 क्विंटलर्पयत होते तर आता उत्पादन 70 ते 80 क्विंटल येत असल्याचे शेतक:यांनी सांगितले.
शेतमाल प्रक्रियेसाठी अनुदान द्यावे
कलसाडी येथील हळद उत्पादक शेतक:याने आठ-दहा वर्षापासून राधाकृष्ण शेतकरी बचत गटाची स्थापना केली आहे. या बचत गटाच्या सदस्यांनी कच्च्या हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलिंग मशीन (भट्टी), इंधन पॉलीश मशीन आदी स्वखर्चाने घेतले आहे. 2011 साली नियमानुसार कृषी विभागाकडे कच्च्या मालावरील प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चाच्या आधारावर अनुदान मिळावे म्हणून रितसर प्रस्ताव दाखल केला आहे. आवश्यक कागदपत्र जोडण्यात आले असून अद्याप अनुदान मिळाले नसल्याची खंत हळद उत्पादक व बचत गटाच्या शेतक:यांनी व्यक्त केली असून त्वरित अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे.