वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडापासून राहा दूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:59+5:302021-07-16T04:21:59+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात वीज पडून दरवर्षी सरासरी पाच लोकांचा मृत्यू होतो. यामुळे वीज कडाडत असताना सुरक्षित ठिकाण शोधून उपाययोजना ...
नंदुरबार : जिल्ह्यात वीज पडून दरवर्षी सरासरी पाच लोकांचा मृत्यू होतो. यामुळे वीज कडाडत असताना सुरक्षित ठिकाण शोधून उपाययोजना करा, असे प्रशासन नेहमी सांगते. यात आता मोबाईल बंद करण्याची सूचनाही प्रशासन करू लागले आहे.
मोबाईल सुरू असताना वीज पडून देशासह राज्यात काहींचा मृत्यू झाल्यानंतर, विजा कडाडत असताना मोबाईल बंद करण्याबाबत सध्या जनजागृती होत आहे. जिल्ह्यात दरवर्षी वीज पडून ठार होणाऱ्या मृतांच्या वारसांना मदत देण्यासह जनावरांची नुकसानभरपाईही देण्यात येते.
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
संगणक, टीव्ही आदी वीज उपकरणे बंद करावीत. मोबाईलचा वापर टाळावा, घराची दारे, खिडक्या बंद कराव्यात. झाडाखाली आश्रय घेऊ नये, वाहनांचा वापर टाळावा.
चार लाखांची मदत
वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाते. पशुपालकांच्या मृत बैलांसाठी २५, तर दुभत्या जनावरांची भरपाई म्हणून ३० हजार रुपये देण्यात येतात.
नागरिकांनी विजांचा कडकडाट झाल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे गरजेचे आहे. सुरक्षा उपायांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
- व्ही. व्ही. बोरसे,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नंदुरबार.
जिल्ह्यात सातपुड्याच्या दुर्गम भागात वीज कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात काही ठिकाणी लायटनिंग अरेस्टर लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दुर्गम भागात आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आश्रमशाळा, ग्रामीण रुग्णालये, तहसील कार्यालय, बँका, तसेच इतर उंच इमारतींवर हे लायटनिंग अरेस्टर लावले आहे. यामुळे विजेचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात दुर्गम भागासोबत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तसेच पालिकांच्या इमारतींवर लायटनिंग अरेस्टर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत सूचना देत हे अरेस्टर लावले गेले आहेत.