नवापूरात बनावट दस्तऐवजाद्वारे 29 लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:45 PM2018-06-16T12:45:04+5:302018-06-16T12:45:04+5:30
लिपीकाचा प्रताप : नवापूर उपकोषागार व स्टेट बँकेतील प्रकार
नंदुरबार : नवापूर उपकोषागार कार्यालयाच्या नावाने खोटय़ा दस्ताऐवजाच्या आधारे कोषागार कार्यालयातील लिपीकाने स्टेट बँकेच्या नवापूर शाखेतून 29 लाख रुपयांचे देयके परस्पर काढून घेतल्याची घटना नवापूरात घडली. याबाबत अपर कोषागार अधिकारी यांनी फिर्याद दिल्याने लिपीक इंदल जाधव व बँकेतील संबधीत अधिका:यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नवापूर उपकोषागार कार्यालयात कार्यरत कनिष्ठ लिपीक इंदल महारू जाधव यांनी 8 ते 12 जून दरम्यान या दरम्यान खोटे दस्ताऐवज तयार केले. नवापूर तहसीलदार यांच्याकडून कोणत्याही रक्कमेचे देयक सादर नसतांना उपकोषागारांचा संगणकीय सब ट्रेझरी नेट या अज्ञावलीमध्ये 29 लाख रुपयांची दोन टोकन ऑनलाईन पारीत केली. मुद्रीत बँक प्रदान सुचना पत्रातील तहसीलदारांची सही व खाते क्रमांकावर खाडाखोड करून उपकोषागार अधिकारी साळी यांच्या खोटय़ा व बनावट सह्या केल्या. ते सुचनापत्र स्टेट बँकेच्या नवापूर शाखेत सादर केले.
त्याआधारे शासकीय रक्कम इंदल जाधव यांनी त्यांच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर त्यांनी एटीएम व बँकेतील काऊंटरवरून 25 लाख 80 हजार रुपये काढून घेतले. स्टेट बँक नवापूर शाखेच्या संबधीत अधिकारी व कर्मचा:यांनी बँक प्रदान सुचना पत्रकावर उपकोषागार यांच्या स्वाक्षरीची पडताळणी केली नाही.
शिवाय व्हाऊचर नसतांना संबधित अधिकारी व कर्मचा:यांनी खोटय़ा दस्ताऐवजांच्या आधारे 29 लाख रुपये इंदल महारू जाधव यांच्या नावावर जमा केली. ही बाब जिल्हा कोषागार कार्यालयात रक्कमेच्या पडताळणीनंतर समोर आली.
याबाबत अपर कोषागार अधिकारी प्रकाश शिवनाथ वायकर यांनी फिर्याद कनिष्ठ लिपीक इंदल जाधव व स्टेट बँकेच्या नवापूूर शाखेतील संबधीत अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक राजपूत करीत आहे.