कृषीपंप बिलाची अडीचशे कोटी व्याज सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:33 PM2021-01-29T12:33:29+5:302021-01-29T12:33:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ५६ हजार ११६ कृषी पंप वीज ग्राहकांकडे ७५४ कोटी रूपयांची वीज बिलाची रक्कम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ५६ हजार ११६ कृषी पंप वीज ग्राहकांकडे ७५४ कोटी रूपयांची वीज बिलाची रक्कम थकीत आहे. निर्लेखनाद्वारे विलंब आकार व व्याजातील एकूण सूट २६३ कोटी इतकी असून ४९० कोटी सुधारित थकबीकीची रक्कम आहे. त्यापैकी प्रथम वर्षी ५० टक्के रकमेचा म्हणजेच २४५ कोटींचा भरणा केल्यास उरलेल्या २४५ कोटीच्या रकमेत सुट मिळणार आहे.
कृषीपंप ग्राहकांना ६०० मिटरपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावरील वीज जोडणीचा/सौर ऊर्जापंपाचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. कृषीपंप ग्राहकास तात्काळ वीज जोडणी पाहिजे असल्यास ग्राहकाने स्वत: खर्च करण्याची मुभा असून त्याचा परतावा वीज बिलाद्वारे करण्यात येणार आहे. कृषी ग्राहकांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र ऑनलाईन लँड बँक पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. याकरीता ३३/११ केव्ही उपकेंद्रापासून पाच कि.मी.च्या परिघामध्ये शासकीय, गायरान किंवा खाजगी जमीन उपलब्ध असल्यास तेथे सौर कृषी प्रकल्पाची उभारणी करुन त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा दिला जाणार आहे. कृषीपंपाच्या वीज बिलातही सवलत देण्यात येत असून त्यानुसार प्रथम वर्षी सुधारित थकबाकीच्या शून्य टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित कृषीपंप ग्राहकाला चालू बिल भरणे क्रमप्राप्त राहील. ग्राहकांना सुधारित थकबाकी भरण्यासाठी तीन वर्षाची सवलत देण्यात आली असून या धोरणांतर्गत सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे.
संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत वसूल झालेल्या वीज बिलाच्या एकूण रक्कमेपैकी ३३ टक्के रक्कम ८० कोटी ९३ लाख जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्येच कृषीपंप ग्राहकांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरली जाईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून एकत्रित वसूल झालेल्या वीज बिलाच्या एकूण रक्कमेपैकी ३३ टक्के ८० कोटी ९३ लाख रक्कम नंदुरबार जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरली जाईल. कृषीपंप ग्राहकांना विद्युत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन दरवर्षी दीड हजार कोटी उपलब्ध करुन देणार असून तो निधी आणि ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर प्राप्त होणारा निधी मिळणून कृषी आकस्मिक निधी (अउऋ) तयार करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा करण्यात नियोजन आहे. अकृषक ग्राहकांची वीज बिले भरण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.
त्यात वसुली कार्यक्षमतेनुसार ग्रामपंचायतींना २० टक्के पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. तसेच ग्राम विद्युत व्यवस्थापक, गाव पातळीवरील सहकारी संस्था, महिलांचा स्वंयसहाय्यता गट इत्यादींना वीज बिल वसुलीचे काम देण्यात येणार असून त्यांना देखील प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण ५६ हजार ११६ कृषी पंप वीज ग्राहक असून त्यांच्याकडे रु. ७५४ कोटी वीज बिलाची थकबाकी आहे. त्यापैकी निर्लेखनाद्वारे विलंब आकार व व्याजातील एकूण सूट २६३ कोटी इतकी असून ४९० कोटी सुधारित थकबीकीची रक्कम आहे.
त्यापैकी प्रथम वर्षी ५० टक्के रकमेचा म्हणजेच २४५ कोटींचा भरणा केल्यास उरलेल्या २४५ कोटीच्या रकमेत सुट मिळणार आहे. सदर योजना रोहीत्रस्तरावर राबवून योजनेचा सर्व फायदा थेट सहभागी होणाऱ्या रोहित्रांवरील कृषी ग्राहकांना देण्यात येणार आहे.
पाच टक्के सवलत : १०० टक्के वीज वसुली असणाऱ्या रोहित्रांवर ग्राहकांना चालू वीज बिलावर दहा टक्के अतिरिक्त सुट देण्यात येणार आहे. तसेच थकबाकी नसणाऱ्या व नियमीत वीज बिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना चालू वीज बिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे.