बचत गटांनी तयार केले अडीच लाख मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:11 PM2020-04-24T17:11:11+5:302020-04-24T17:12:14+5:30
या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना संसगार्मुळे लॉकडाउन व संचारबंदीमुळे उद्योगधंद्यांसह अनेक लघु उद्योगांनाही फटका बसला असून, रोजंदारीने काम करणाऱ्या असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व बचत गटांना मास्कची निर्मिती करण्याच्या केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील २११ बचत गटांनी प्रतिसाद दिला आहे. या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर गेल्या महिन्यापासून संचारबंदी, लॉकडाउन करण्यात आले असून, त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. विशेष करून ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबांची ससेहोलपट होत आहे. लहान-मोठे उद्योगही बंद पडल्याने गावोगावी कार्यरत असलेल्या महिला बचत गटातील महिलांच्याही हातातील कामे बंद पडल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून महिला बचत गटांना आर्थिक मदत देऊन मास्क तयार करण्याचे काम दिले. त्यासाठी काही बचत गटांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील २११ महिला बचत गटांनी प्रतिसाद दिला. सध्या बाजारपेठेत मास्कची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी बचत गटांनी गेल्या काही दिवसांतच दोन लाख ३८ हजार मास्क तयार केले. त्याची विक्री स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींना करण्यात येऊन महिलांना रोजगार निर्मितीबरोबरच २२ लाख रुपयांची उलाढालही झाली. महिला बचत गटांना मास्क निर्मितीतून रोजगार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा हातभार लागल्याचे बनसोड यांनी सांगितले.
चौकट===
अंतराचे भान
मास्क बनविण्यासाठी लागणारी शिलाई मशीन प्रत्येकीकडे नसल्याने इतरही बचतगटाच्या महिलांना एकत्र केले व प्रत्येकीने स्वत:च्या घरी राहूनच डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून काम पूर्ण केले. ग्रामस्तरावर मास्क बनविण्याच्या कल्पनेमुळे गावागावात कोरोना आजाराविषयीची जनजागृतीही झाली व गावपातळीवर अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्या माध्यमातून मास्कचे महत्त्व कळाले. त्याचबरोबर महिलांच्या घरखर्चाला हातभार लागला.
- देवयानी पाटील, अध्यक्ष, बचत गट