दुकानातून अडीच लाखांचे मोबाईल चोरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:11 PM2020-12-06T12:11:06+5:302020-12-06T12:11:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नवशक्ती कॅाम्पलेक्स मधील मोबाईल दुकानातून चोरट्याने दोन लाख ४९ हजार ७९९ रुपयांचे नवे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील नवशक्ती कॅाम्पलेक्स मधील मोबाईल दुकानातून चोरट्याने दोन लाख ४९ हजार ७९९ रुपयांचे नवे व जुने मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
गोपी गोविंद काठेवाडी, (२१) रा.संगमटेकडी, नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नवशक्ती कॅाम्पलेक्समधील संजय टाईम्स या मोबाईल विक्री व दुरूस्तीच्या दुकानातून ३ व ४ डिसेंबर रोजी रात्रीतून चोरट्यांनी ३४ नवे व जुने मोबाईल चोरून नेले. त्याची किंमत दोन लाख ४९ हजार ७९९ रुपये इतकी आहे. सकाळी दुकान मालक शंकर नानोमल मंदाना हे दुकानात आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर शहर पोलीस ठाणे आणि एलसीबीच्या पथकाने याबाबत तपासाची चक्रे फिरवली. दुकानातील व आजूबाजुच्या दुकानांच्या बाहेरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले. त्यात शहरातील दुध डेअरीनजीक संगमटेकडी परिसरात राहणारा गोपी गोविंद काठेवाडी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी पहाटे पावणेदोन वाजता त्याला त्याच्या घरातून शिताफीने अटक केली. तपास सहायक निरिक्षक डी.एस.शिंपी व बिऱ्हाडे करीत आहेत.