नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: September 27, 2023 09:55 PM2023-09-27T21:55:48+5:302023-09-27T21:59:13+5:30
एकाच दिवशी नवापूर तालुक्यातील तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाड्याच्या धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत भवर, ता.नवापूर येथील धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी नवापूर तालुक्यातील तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा धरणात आर्यन गोरख वळवी (१४), प्रीतम गोरख वळवी (१२) असे दोघे सख्खे भाऊ त्यांच्या शेतालगत असलेल्या धरणात गेले असता धरणाच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, ते अयशस्वी ठरले. दरम्यान या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी व खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही सख्या भावांचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला.
नवापूरच्या युवकाचाही मृत्यूदरम्यान, नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीतील निखिल कैलास राजपूत (१७) या युवकाचाही भवरे येथील धरणात बुडून मृत्यू झाला. निखिल व त्याचे सहकारी चार मित्र भवरे धरणावर पोहोण्यासाठी गेले असता धरणातील गाळात अडकल्याने निखिलचा मृत्यू झाला. तो नवापूर येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूलमध्ये ११ वीच्या वर्गात शिकत होता. त्याचा मृतदेह नवापूर उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाईक व मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद नवापूर पोलिसात करण्यात आली आहे.