विजेच्या धक्क्याने दोन बैल व गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:26 AM2019-07-11T11:26:22+5:302019-07-11T11:26:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बुधवारी पहाटे दोन वाजता खांबावरुन विजेची तार तुटून पडल्याने दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बुधवारी पहाटे दोन वाजता खांबावरुन विजेची तार तुटून पडल्याने दोन बैल व गाय ठार झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत निंबा राजाराम कोळी हे जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे शिलावद बरडा भागातील निंबा राजाराम कोळी हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांनी रात्री आपल्या अंगणात दोन बैल व गाय बांधली होती. त्यांच्या आई सविता राजाराम कोळी या अंगणातच खाटेवर झोपल्या होत्या. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास खांबावरून अचानक विजेची तार खाली पडली. ही तार सविताबाई झोपलेल्या खाटेवर पडली. मात्र त्यांनी अंगावर जाड गोधडी पांघरल्यामुळे त्यांच्या अंगाला स्पर्श झाला नाही. मात्र जवळच बांधलेल्या दोन बैल व गायीवर ही तर पडली. सविताबाईंनी भेदरलेल्या अवस्थेत घरात झोपलेल्या निंबा कोळी यांना आरडाओरड करून बोलावले. बाहेर अंधार असल्याने निंबा कोळी यांना तार दिसली नाही. त्यांचा पाय त्या वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेवर पडल्याने ते बैलगाडीवर फेकले गेले. त्यात त्यांना मुका मार बसून जखमी झाले. मात्र त्यांचे दोन बैल व दुभती गाय जागीच ठार झाले. या दुर्घटनेमुळे निंबा कोळी यांचा उदरनिवार्हाचा मार्ग आजच बंद झाला आहे. दूध देणारी गाय व शेतात राबणारे दोन बैल अचानक डोळ्यासमोर मरण पावल्याने त्यांना रडू कोसळले. घटनेनंतर परिसरातील लोकांनी लाईनमन व वायरमन यांना बोलवून वीजपुरवठा बंद केला. कोळी यांना माजी सरपंच रफीक खाटीक व अरुण भिल यांनी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. घटनेची माहिती मिळताच सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रा.पं. सदस्य अरुण भील, हरी पाटील आदींनी भेट दिली. सकाळी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी गौतम बोराळे, उंद्या गुलाले, सोहील शेख यांनी या घटनेचा पंचनामा केला. त्यात 70 हजाराचे दोन बैल व 30 हजाराची गाय ठार झाल्याने त्यांचे एक लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा त्यांनी केला. या वेळी तलाठी डी.एम. चौधरी यांनीही या घटनेचा पंचनामा करुन तहसीलदार मनोज खैरनार यांना अहवाल पाठविला. पशुवैद्यकीय अधिकारी योगेश देशमुख व परिचर गणेश धनगर यांनी बैल व गायीचे शवविच्छेदन केले.