बनावट वाहन नोंदणी प्रकरणी आरटीओचे दोन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 07:59 PM2022-08-22T19:59:03+5:302022-08-22T19:59:11+5:30
नंदुरबार आरटीओ कार्यालयाअंतर्गत बोगस वाहन नोंदणी प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे.
मनोज शेलार
नंदुरबार : बनावट वाहन नोंदणी प्रकरणी परिवहन आयुक्तांनी नंदुरबार आरटीओ कार्यालयातील दोन वरिष्ठ लिपिकांना निलंबीत केले आहे. विशेष म्हणजे ज्या लिपीकाने नंदुरबार पोलिसात फिर्याद दिली त्यांनाच निलंबीत करण्यात आले असल्याने खळबळ उडाली आहे. जयसिंग बागुल व कांतिलाल अहिरे असे निलंबीत केेलेल्या दोघांची नावे आहेत.
नंदुरबार आरटीओ कार्यालयाअंतर्गत बोगस वाहन नोंदणी प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याने परिवहन आयुक्तांनी याबाबतीत गांभिर्याने घेतले आहे. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरले आहे. जयसिंग बागुल यांनी याबाबत फिर्याद देऊन आपला व वरिष्ठ लिपीक कांतिलाल अहिरे यांचा युजर आयडी हॅक करून अज्ञात व्यक्तीने ८३ वाहनांची बनावट नोंद केली. त्यातून शासनाची ६६ लाख ५९ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी देखील लागलीच तपासाला सुरुवात करून राज्यभर तपासासाठी पथके पाठविली आहेत. आता या प्रकरणात आणखी एक व्टिस्ट आले आहे. परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी ज्यांचा युजर आयडी हॅक झाला होता व फिर्यादी असलेले जयसिंग बागुल व कांतिलाल अहिरे यांनाच निलंबीत केले आहे. निलंबन काळात जयसिंग बागुल यांचे मुख्यालय हे जळगाव आरटीओ कार्यालय तर कांतिलाल अहिरे यांचे मुख्यालय धुळे आरटीओ कार्यालय राहणार आहे.