पेट्रोल टाकून नंदुरबारात दोन दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:47 AM2019-03-18T11:47:49+5:302019-03-18T11:48:21+5:30
सहा युवकांविरुद्ध गुन्हा : सकाळी घडली घटना, फिर्यादीत कारण मात्र नमुद नाही
नंदुरबार : नंदुरबार ते आष्टे दरम्यान रविवारी सकाळी दोन दुचाकी युवकांनी जाळल्याची घटना घडली. दोन्ही दुचाकींवरील लोकांकडून रोख रक्कम आणि मोबाईल देखील हिसकवून घेत पोबारा केला. याबाबत दोन संशयीतांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुचाकी जाळण्यामागचे कारण काय? याबाबत मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
नंदुरबारहून पिंपळनेर व निजामपूरकडे जाण्यासाठी दोन दुचाकीस्वार सकाळी पावणेसात वाजता निघाले. दोन्ही युवक एकमेकांपासून दोन ते तीन किलोमिटर अंतरावर चालत होते. त्यापैकी जफरखान जैनोद्दीन कुरेशी (४२) रा.कुरेशी मोहल्ला, बीफ मार्केटरोड, नंदुरबार यांची मोटरसायकल (क्रमांक एमएच ३९ -४३१२) पाच ते सहा युवकांनी जिल्हा कारागृहासमोर अडवली. कुरेशी यांना दुचाकीवरून उतरवून ती ताब्यात घेतली. त्यावर पेट्रोल ओतून दुचाकी जाळून टाकली. शिवाय त्यांच्य खिशातील तीन हजार रुपये रोख हिसकवून घेतले व मोबाईल रस्त्यावर आपटून फोडून टाकला. त्याच ठिकाणी इरफान सलीम कुरेशी हा देखील आला. त्याचीही दुचाकी अडवून त्याच्या खिशातील ममोबाईल काढून घेत तो जाळून टाकला व त्याच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेतले.
यानंतर याच युवकांनी निजामपूर येथील युवकाचाही पाठलाग केला. त्याला आष्टे गावाच्या पुढील बारीमध्ये अडवून त्याचीही मोटरसायकल जाळून टाकली. त्यानंतर हे युवक तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
पोलिसांना ही घटना कळताच शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळाकडे धावले. त्यांनी जेमतेम जळणाऱ्या दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला.
याबाबत जफरखान कुरेशी यांनी लेखी फिर्याद दिली आहे. त्यावरून भूषण पाटील व सचिन नामक युवकांसह इतर चार जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पवार करीत आहे.
दरम्यान, दुचाकीवर जाणाऱ्या तिघांकडे काय होते. युवकांनी त्यांनाच का अडवून दुचाकी जाळल्या याबाबत चर्चा आहे. पोलिसांनी देखील त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.