शहाद्यातील दोघांना गावठी पिस्तुलासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:47 PM2021-01-14T12:47:04+5:302021-01-14T12:47:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील रहिवासी असलेल्या दोघांना बोरीवली येथून पोलिसांनी चार गावठी बनावटीचे पिस्तुले आणि १० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील रहिवासी असलेल्या दोघांना बोरीवली येथून पोलिसांनी चार गावठी बनावटीचे पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा शहरातील काझीपुरा भागातील एक ४२ वर्षीय व इक्बाल चाैक परिसरात राहणारा ३० वर्षीय संशयित पिस्तुलांची विक्री करण्यासाठी बोरीवली परिसरात येणार असल्याची माहिती तेथील क्राईम ब्रांचचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बोरीवली येथे नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केली होती. दरम्यान, शहादा येथील चारचाकी वाहन दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यांची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान दोघांकडे चार गावठी बनावटीचे पिस्तुल व १० जिवंत काडतुसे असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दोघांना तातडीने अटक करण्यात येऊन त्यांच्याविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दोघा संशयितांना १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहादा परिसरात मध्य प्रदेशातून होणाऱ्या गावठी कट्ट्याच्या अवैध धंद्यांची पाळमुळे असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.