अक्कलकुव्यात एकाच कुटूंबातील दोनजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:31 PM2020-04-26T13:31:44+5:302020-04-26T13:31:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा शहरातील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या शहरातील एकाच कुटुंबातील दोघींना कोरोना ची लागण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा शहरातील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या शहरातील एकाच कुटुंबातील दोघींना कोरोना ची लागण झाली आहे. दोन्हींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात आणखी पुढील तीन दिवस दवाखाने व मेडिकल वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
अक्कलकुवा शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढून तीन झाल्याने शहरात काहीसे भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्यांपैकी दोन महिला रुग्णांच्या तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वीच प्रतिबंधित करण्यात आलेल्या भागातीलच हे रुग्ण असल्यामुळे हा भाग पुन्हा तीन दिवस प्रतिबंधित करण्यात आले आहे. ऊर्वरित सर्व ३९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असुन अद्यापही सहा जणांचे तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. जे दोन रूग्ण पॉझिटिव्ह निघाले त्यात एक २१ वषार्ची तरूणी व ४८ वर्षाची महीला यांचा समावेश आहे. आता शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढून तीन झाल्यामुळे अक्कलकुवा शहरासह परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून शहराचा काही परिसर सील करण्यात आला आहे. शहरही आणखी पुढील तीन दिवस म्हणजे २९ एप्रिल पर्यंत पुर्णत: लॉकडाऊन ठेवून शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोना चे रूग्ण वाढल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अकक्लकुवा पासुन चार कि.मी.अंतरावर असलेले वाण्याविहीर गाव देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. गावातील सर्व नागरिक ,व्यापारी , ग्रामस्थ यांनी एकजुटीने गांव बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन वाण्याविहीर गावात दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. गावाचे चारही बाजुचे रस्ते मोठ-मोठी झाडे आडवे करून बंद करण्यात आले आहेत. खबरदारीचा ऊपाय म्हणुन सर्वांनी घरातच रहावे असे आवाहन स्वयंसेवकांकडून करण्यात येत आहे.
अकक्लकुवा तालुकासह शहरवासियांनी स्वत:ची काळजी घ्या तसेच जे कोणी या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:हून पुढे येऊन माहीती द्यावी. जेणे करून शहरात आणखी रूग्ण वाढणार नाही याची खबरदारी म्हणून प्रशासनाला मदत होईल. तसेच शहर पुर्णत: सील केल्याने बाहेरचा कोणीही आला तर लगेच प्रशासनाला कळवावे. असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे यांनी केले आहे.
तालुक्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बाब गंभीर असून या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे. संपूर्ण लॉक डाऊन पाळत घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार विजयसिंग कच्छवे यांनी केले आहे.
अक्कलुवा तालुक्यात जवळपास पाच हजार लोकांना होम तसेच संस्थात्मक क्वारंटाईन केले गेले आहे. अक्कलकुव्यात १६ पथके कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
शहरात यापूर्वी तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद होत्या. या तीन दिवसांसाठी संपूर्ण लॉक डाऊन तसेच संचारबंदी आदेश देण्यात आले होते. २५ रोजी भाजीपाला व किराणा घेण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काहीशी शीथिलता मिळेल या अपेक्षेने शहरातील भाजीपाला दुकाने तसेच किराणा दुकाने सकाळी सुरू झाली होती. मात्र प्रशासनाला शहरात पुन्हा दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने २७ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा दुकाने पुन्हा तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने तात्काळ दिले. यावेळी भाजीपाला व किराणा घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांनी मागे फिरवले व सर्व भाजीपाला व किराणा दुकाने बंद केली.