पुण्याच्या दोघांनी दारू पिऊन कार चालविली, कारवाईवेळी आरडाओरड केली
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: March 31, 2023 06:24 PM2023-03-31T18:24:08+5:302023-03-31T18:24:21+5:30
पोलिसांनी त्यांना कारवाईसाठी थांबविले असता चव्हाण व हरणावळ यांनी जोरजोरात आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.
नंदुरबार : धडगाव- रोषमाळ रस्त्यावर दारू पिऊन कार चालविणाऱ्यांना अडविले असता त्यांनी पोलिसांशी आरडाओरड करीत कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील दोन जणांविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश नामदेव चव्हाण (३०), रा. शिरसाठवाडी, ता. इंदापूर व अनिल विठ्ठल हरणावळ (४२), रा. हरणावळ वस्ती, ता. इंदापूर, जि. पुणे, असे कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. धडगाव येथील मुख्य रस्त्यावर चव्हाण हे त्यांची कार (क्रमांक एमएच ४२ एक्सयू ४७९८) भरधाव व वेडीवाकडी वळणे घेत चालवीत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारूच्या नशेत आढळले.
पोलिसांनी त्यांना कारवाईसाठी थांबविले असता चव्हाण व हरणावळ यांनी जोरजोरात आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. त्यामुळे पोलिस कर्मचारी विनोद पाटील यांनी फिर्याद दिल्याने धडगाव पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस कर्मचारी शशिकांत वसईकर करीत आहेत.