ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:15 PM2020-11-22T12:15:16+5:302020-11-22T12:15:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : वशहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळील चांदसैली गावानजीक समोरून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅकटरला ट्रकने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : वशहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळील चांदसैली गावानजीक समोरून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅकटरला ट्रकने धडक दिल्याने ट्रॅकटरचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली. त्यात सुदैवाने जीवितहानी टळली.
सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशातील मेंद्राणे येथील ट्रॅक्टर (क्रमांक एम.पी. ४६ ए-४८०२) हे शहादा तालुक्यातील पाडळदा येथून ऊस भरून मध्य प्रदेशातील दुर्गा खांडसरी येथे घेऊन जात असताना शहादा-खेतिया रस्त्यावरील चांदसैली गावानजीक कच्चा रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.एच. १८ ए. ए. ९४०३) ट्रॅकटरच्या उजव्या बाजूने मोठ्या टायरला ठोस मारल्याने अपघात घडला. अपघात एवढा भयानक होता की ट्रॅकटरचे इंजिन जवळ तुटून तुकडे झाले. तसेच ट्राली ट्रॅक्टरपासून वेगळी झाली. अपघात घडताच ट्रक चालक व क्लिनर हे घटनास्थळवरून ट्रक सोडून पसार झाले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समजते. ट्रॅक्टर चालक अनिल झुलाल मालचे (२५) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.काँ.धीरसींग वळवी हे करीत आहेत.
अपघाताचे सत्र चिंताजनक
गेल्या १५ दिवसांपासून शहादा-खेतिया रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरु आहे. अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी ब्राह्मणपुरीनजीक मोटारसायकल अपघातात एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. तसेच लोणखेडा चार रस्त्यावर अज्ञात ट्रक चालकाने पादचारीला चिरडून पोबारा केल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर लहान-मोठे अपघात तर नित्याचे झाले असून अपघाताचे प्रमाण वाहनधारकांना चिंताजनक ठरत आहेत.