नंदुरबार आगाराला मिळाल्या दोन शिवशाही बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:46 PM2017-12-25T12:46:40+5:302017-12-25T12:47:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खाजगी ट्रॅव्हल्स सोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नंदुरबार आगाराला दोन शिवशाही बसेस दिल्या आहेत. सध्या नंदुरबार-पुणे या मार्गावर ही बस धावणार आहे. वातानुकुलीतसह सर्व अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये राहणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस आरामदायी असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी सहाजिकच खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळतात ही बाब लक्षात घेता महामंडळाने शिवशाही बसेस रस्त्यावर उतरविल्या आहेत. धुळे विभागाला प्रथमच या बसेस मिळाल्या आहेत. त्यातील दोन बसेस नंदुरबार आगाराला दिल्या गेल्या आहेत. आगाराने नंदुरबार-पुणे मार्गावर ही बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबारहून दररोज रात्री साडेआठ वाजता ही बस सुटेल. दोंडाईचा, धुळे, मालेगाव, शिर्डी, नगरमार्गे पुण्याला ही बस जाणार आहे. येण्याचा मार्ग देखील तोच राहणार आहे. या बसचे भाडे 705 रुपये राहणार आहे. 12 वर्षाआतील बालकांना अर्धे भाडे आकारले जाणार असून महामंडळाच्या प्रवाशांसाठी असलेल्या इतर कुठलीही सवलत या बसमध्ये लागू राहणार नाहीत. सध्या केवळ दोनच बस मिळाल्या असल्याने केवळ पुणे मार्गावर त्या धावतील. आणखी बस मिळाल्यावर मुंबई मार्गावर देखील या बस सोडण्यात येणार आहे.