राज्यातील सर्वच प्रकल्प कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी दोन क्रीडा आश्रमशाळा सुरू होणार!
By मनोज शेलार | Published: December 6, 2023 07:50 PM2023-12-06T19:50:51+5:302023-12-06T19:55:44+5:30
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची माहिती
मनोज शेलार, नंदुरबार: राज्यातील सर्वच आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी दोन क्रीडा आश्रमशाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यात एक मुलांसाठी व एक मुलींसाठी राहणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मंत्री गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आराखडादेखील तयार झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या १३ वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या निधीला कात्री लावली जात होती. दोन टक्के कमी निधी मिळत होता. त्यामुळे आदिवासी विकासाच्या योजना राबविताना कसरत होत होती. आपण या विभागाचे मंत्री झाल्यानंतर लोकसंख्येच्या तुलनेत अर्थात ९.३५ टक्के निधी उपलब्ध करून घेतला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही सहकार्य केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडेही आपण विशेष लक्ष देत असल्याचे सांगत शासकीय आश्रमशाळांना येत्या काळात नवीन इमारती उपलब्ध होणार आहेत. डिजिटल आणि व्हर्च्युअल क्लासरूमसह ई-लायब्ररी उपलब्ध करून देत आहोत असेही त्यांनी सांगितले.