दुमजली घराला आग संसार झाला बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 12:36 PM2020-12-31T12:36:45+5:302020-12-31T12:37:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराती मंगळबाजारानजीकच्या सिद्धिविनायक चौकातील जुन्या दुमजली घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. फळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराती मंगळबाजारानजीकच्या सिद्धिविनायक चौकातील जुन्या दुमजली घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. फळ व भाजीपाला विक्रेत्या परिवाराचा संसार उघड्यावर आला आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या भागात मंगळवार बाजाराची गर्दी असल्याने आग विझविण्यासाठी मोठी कसरत झाली.
सिद्धीविनायक चौकात लाकडी इमारतीचे दोनमजली घर आहे. या घरात फळ व भाजीपाला विक्रेते चेतनसिंह देवीसिंह राजपूत हे परिवारासह भाडेतत्वावर राहतात. आज आठवडे बाजार असल्याने ते सकाळीच आपल्या व्यवसायावर निघून गेले होते. त्यांच्या पत्नी सकाळी बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. घरात त्यांची मुलगी होती. घरातून धूर निघत असल्याचे परिसरातील एका युवकाच्या लक्षात आले.
आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने पाण्याच्या वर्षाव आगीवर करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु, आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर येत असल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन बंब आल्यानंतर पालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. आग सुरु असताना काही युवकांनी धाडस करून संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. तोपर्यंत अनेक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होत्या. आगीत सव्वा दोन लाख रुपये, घरातील पंखे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही,अन्नधान्यसह इतर वस्तू बेचिराख झाल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
फळविक्रेत्याचा संसार आला उघड्यावर...
चेतनसिंह राजपूत शहरातील जुन्या नगरपालिकेच्या चौकात ऋतुमानानुसार फळे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लहानपणापासूनच अत्यंत मेहनती असलेले चेतन राजपूत यांनी कष्ट करून पै-पैसा जमवून घरात संसारोपयोगी साहित्याची जुळवाजुळव केली. परंतु, घराला अचानक आग लागल्याने सर्वच वस्तू खाक झाल्याने परिवार उघड्यावर आला आहे. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने चेतनसिंह राजपूत व त्यांच्या पत्नीला यांना रडू कोसळले. आगग्रस्त घराची भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पाहणी केली.
अग्नीशमन बंबला गर्दीमुळे अडथळे... : आज मंगळवार आठवडे बाजार असल्याने मंगळ बाजारात खरेदी विक्री करणाऱ्यांची गर्दी होती. आग लागल्याचे कळताच पालिकेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. परंतू, बाजारात गर्दी असल्याने अग्निशमन बंबला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळ्यांच्या सामना करावा लागला.