17 लाखांच्या कापूससह दोघांनी ट्रकही पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:48 AM2018-08-13T11:48:08+5:302018-08-13T11:48:15+5:30
अनरद बारी : वडाळीत चार लाखाच्या कापडाच्या गाठींची चोरी
नंदुरबार : अनरद शिवारातून 17 लाखाच्या कापूसह ट्रक पळविल्याची घटना 10 रोजी रात्री घडली तर वडाळी शिवारातील हॉटेल परिसरात ट्रकमधून चोरटय़ांनी तीन लाख 86 हजार रुपये किंमतीच्या कापडाच्या गाठी चोरून नेल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यप्रदेशातून गुजरातकडे कापूस गाठी घेवून जाणारा ट्रक दोघांनी हॉटेलच्या आवारातून लंपास केल्याची घटना अनरद, ता.शहादा शिवारात घडली. 17 लाख 72 हजारांचा कापूस तर ट्रकची किंमत चार लाख रुपये आहे.
मध्यप्रदेशातील धार येथील व्यापारी महेंद्रकुमार तनसुखराय अग्रवाल यांनी गुजरातमध्ये विक्रीसाठी 15 हजार 665 क्विंटल कापूस ट्रकने (क्रमांक एमपी 09 एचएफ 1629) पाठविला होता. ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील अनरद शिवारातील हॉटेल उगाईवर हा ट्रक 10 ऑगस्ट रोजी रात्री थांबला होता. त्यावेळी संशयीत इरफान याकुबखान रा.वलवड व जितेंद्र जगदीश देवला रा.अजमल (मध्यप्रदेश) यांनी चालकाची नजर चुकवून हा ट्रक लंपास केला.
17 लाख 72 हजार 636 रुपयांचा कापूस व चार लाख रुपयांचा ट्रक असा एकुण 21 लाख 72 हजार 636 रुपयांचा मुद्देमाल दोघांनी चोरून नेला.
व्यापारी महेंद्रकुमार अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून इरफानखान व जितेंद्र देवला यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पगार करीत आहे.
वडाळी शिवारातून चार लाखाच्या कापडाच्या गाठी चोरीस
दुसरी घटना वडाळी शिवारात घडली, ट्रकची ताडपत्री कापून चोरटय़ांनी तीन लाख 86 हजार रुपयांच्या कापडाच्या गाठी लंपास केल्या.
शहादा-शिरपूर रस्त्यावर गुजरातमधून मध्यप्रदेशात कापडाच्या गाठी घेवून ट्रक (क्रमांक एमएच 15 बीए 2933) जात होता. 6 ऑगस्ट रोजी रात्री ट्रक वडाळी गावाच्या शिवारातील हॉटेल परिसरात थांबला असता चोरटय़ांनी ट्रकची ताडपत्री कापून आतील 14 कापडाच्या गाठी चोरून नेल्या. त्यांची किंमत तीन लाख 86 हजार 314 रुपये आहे. चालकाला ही बाब कळाल्यावर त्याने मालकाला याबाबत माहिती दिली. तसेच कापडाचे एकुण गाठी मोजून हिशोब केला.
मालकाने शहादा येथे येवून तपास केला. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी रात्री सारंगखेडा पोलिसात गेले. तेथे चालक रऊफखान मजिदखान, रा.शहादा यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार बागले करीत आहे.
लागोपाठच्या या दोन घटनांमुळे या परिसरात रात्रीच्या वेळी वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.