उधना-जळगाव दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाच्या ट्रॅकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:19 PM2018-04-02T12:19:47+5:302018-04-02T12:19:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. अधिकृत उद्घाटनही लवकरच होण्याची शक्यता बळावली आहे.
उधना-जळगाव या 306 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी सन 2008-09 मध्ये 715 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली होती. परंतु मुदतीत हे काम पुर्ण न झाल्याने हा खर्च दुप्पट अर्थात एक हजार 390 कोटी रुपयांर्पयत गेला आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात या कामासाठी थोडय़ा-थोडय़ा निधीची तरतुद होत होती. त्यामुळे काम रेंगाळले होते. आता हे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. केवळ नंदुरबार-दोंडाईचा दरम्यान बाकी असलेले हे काम 90 टक्के पुर्ण झाले असून केवळ या दरम्यानच्या नवीन मार्गाची चाचणी घेण्याचे बाकी आहे.
पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा मार्ग
पश्चिम रेल्वेचा महत्वाचा मानला गेलेला ताप्ती सेक्शनचा या मार्गाचे दुहेरीकरण व्हावे यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती. ती आता पुर्णत्वास येत आहे. 2004-05 मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती. तत्कालीन खासदार माणिकराव गावीत यांनी हा रेल्वेमार्ग मंजुर करून आणला होता. परंतु निधिची तरतूद होत नसल्याने तीन ते चार वर्ष हे काम रखडले होते. अखेर 2008-09 मध्ये या कामासाठी ठोस अशा निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर कामाला वेग आला. त्यासाठी विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. दरवर्षी निधी मिळत गेल्याने अखेर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे.
दुप्पटीने वाढला खर्च
आधी केवळ 715 कोटी रुपये खर्चाची मंजुरी असलेल्या या रेल्वेमार्गाच्या कामासाठी विलंब होत गेल्याने त्याचा खर्च दुप्पट वाढला. तब्बल एक हजार 390 कोटी रुपयांचा सुधारीत बजेट तयार करून ते काम सुरू करण्यात आले. सध्य स्थितीतही खर्च वाढला आहे.
306 किलोमिटर लांबी
भुसावळ-सुरत म्हणून हा रेल्वेमार्ग ओळखला जातो. या रेल्वेमार्गापैकी भुसावळ ते जळगाव व सुरत ते उधना या दरम्यान या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आहेच. त्यामुळे उधना ते जळगाव या मार्गाचे अर्थात 306 किलोमिटरचा दुसरा रेल्वे मार्ग टाकला जाणार होता. टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात आले. आधी जळगाव कडून कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चलथान कडून कामाला सुरुवात झाली.
असे झाले काम
उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते.
2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्णत्वास आले आहे.
उधना-जळगाव या दरम्यानच्या रेल्वेमार्गापैकी केवळ नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटरचे काम बाकी होते. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांनी मार्च अखेर मुदत दिली होती. रेल्वेच्या संबधित विभागाने ते आव्हान पेलून ते काम मार्च अखेर पुर्ण करण्याचा प्रय} केला आहे. आता रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात येईल. नेहमीच्या वेगात चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. येत्या आठ दिवसात ही चाचणी होणार आहे. त्यानंतर या दुस:या रेल्वे मार्गाचे अधिकृतरित्या उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.