बेरोजगारीची अजब मार, कोतवाल पदासाठी उच्चशिक्षितही तयार

By भूषण.विजय.रामराजे | Published: August 29, 2023 06:13 PM2023-08-29T18:13:30+5:302023-08-29T18:15:02+5:30

शेवटच्या दिवसात १०७ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ही ५७० एवढी झाली आहे.

Unemployment strikes, highly educated also ready for Kotwal post | बेरोजगारीची अजब मार, कोतवाल पदासाठी उच्चशिक्षितही तयार

बेरोजगारीची अजब मार, कोतवाल पदासाठी उच्चशिक्षितही तयार

googlenewsNext

नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा उपविभागांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील सहा तलाठी सजांमध्ये कोतवाल पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काेतवाल पदासाठी आतापर्यंत ५७० अर्ज प्राप्त झाले असून, यात चक्क सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्यांपासून विविध विषयात नेट-सेट उत्तीर्ण उच्चविद्याविभूषित युवकांच्या अर्जांचा समावेश आहे. तालुक्यातील मोरंबा, काठी, सिंगपूर बु्द्रुक, मांडवा आणि डाब या सहा तलाठी सजांमध्ये काेतवाल भरतीप्रक्रिया १२ ऑगस्टपासून जाहीर झाली होती. २८ ऑगस्टपर्यंत अक्कलकुवा तहसीलदार कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात आले होते.

दरम्यान, शेवटच्या दिवसात १०७ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ही ५७० एवढी झाली आहे. यात कोतवाल पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये सिव्हिल इंजिनिअर, बीई, एमसीए, डी फार्मसी, एमए, एलएल.बी, बीटेक, एम.एस्सी., बी.एड, एम.ए., एमएसडब्ल्यू,नेट-सेट पात्रता मिळवणार आणि बीसीए उत्तीर्ण झालेले उच्चशिक्षित बेरोजगार अर्जदार आहेत.महिला आरक्षण असलेल्या मांडवासाठी २७, तर ब्राह्मणगाव येथील पदासाठी २४ अर्ज प्राप्त झाले आहेत. इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. तालुक्यातील सहा सजामधील मांडवा व ब्राह्मणगाव महिला आरक्षित होते.

मांडवा सजामध्ये मांडवा, डेब्रामाळ, पलासखोब्रा, साबंर, वेलखेडी, कंजाला, ब्राह्मणगाव सजामध्ये ब्राह्मणगाव, कडवामहू, कौलीगव्हाण, नैनशेवडी, मोरंबा सजामध्ये मोरंबा, रोजकुड, रतनबारा, भराडीपादर, कुंडी, दसरापादर, काठी सजामध्ये मालपाडा, भगदरी, चनवाई, वेरी, पिंप्रापाणी, ओलपाडा, सिंगपूर सजेत सिंगपूर बुद्रुक, माडवीआंबा, भाबलपूर, जानीआंबा, डाब सजामध्ये डाब, वालंबाका, तोडीकुंड, वाडीबार, साकलीउमर ही गावे आहेत.अंतिम मुदतीत मोरंबा सजा ८३, ब्राह्मणगाव २४, काठी १८२, सिंगपूर बुद्रुक ९३, मांडवा २७ तर डाब सजामधील गावांसाठी तब्बल १६१ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: Unemployment strikes, highly educated also ready for Kotwal post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.