कामगार पूजनाची ‘सातपुडय़ा’त अनोखी प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:14 PM2019-10-27T12:14:00+5:302019-10-27T12:14:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोणताही उद्योगाच्या भरभराटीत कामगारांचे कष्ट खूप मोलाचे असतात. कामगारांनी रक्ताचे घाम करून कष्ट केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोणताही उद्योगाच्या भरभराटीत कामगारांचे कष्ट खूप मोलाचे असतात. कामगारांनी रक्ताचे घाम करून कष्ट केले तरच उद्योगाला उत्तुंग वैभव प्राप्त होऊ शकते. उद्योग आपलाच आहे या भावनेने अपार कष्ट सोसणा:या कामगारांचे मोल फक्त पैशाने मोबदला देऊन करता येत नाही तर त्याचा सन्मानाचे रक्षण करणेही तेवढेच महत्वाचे असते. याच भावनेने कामगारांशी सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे व त्यांचा स्वाभिमान व सन्मानही राखला जावा यासाठी धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी कामगारांनाच ‘धन’ मानून त्यांची पूजा करण्याची आगळीवेगळी परंपरा श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सुमारे 20 वर्षापासून जोपासली आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याजवळील धनाची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. सातपुडा साखर कारखान्यात मात्र आपल्या कारखान्यातील कामगारांनाच धन मानून गेल्या 20 वर्षापासून कामगारांची पूजा केली जाते. यंदाही कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दत्तात्रयाच्या पूजेसोबतच कामगारांची पूजा केली. कारखान्यात आजच्या स्थितीत सुमारे 650 कामगार कार्यरत आहेत. त्यांना नियमित पगार तर दिला जात आहेच शिवाय दीपावलीचा बोनसही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यासोबतच कामगारांचा सन्मान केला जात असल्याने त्यांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना कामगारांची आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी शेतकरी व कामगारांच्या हितासाठी उभारलेल्या शेतक:यांच्या मालकीच्या असलेल्या सातपुडा साखर कारखान्याच्या उभारणीने परिसराला वैभव प्राप्त झाले आहे. अनेक अडचणींवर मात करीत हा कारखाना शेतकरी व कामगाराच्या हितासाठी कार्यरत आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरु आहे. कारखान्यामुळेच शेतक:यांना सुखाचे दिवस आले आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगार हा घटक अतिमहत्त्वाचा आहे. त्यांची कामगिरी अत्यंत मोलाची आहे. यंदाही परिसरात उसाचे प्रमाण मुबलक असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालून शेतक:यांच्य सर्व उसाचे गाळप करून निर्धारित साखरेची निर्मिती होणार आहे. त्यात कामगारांचीही मेहनत मोलाची असणार आहे. कामगार उत्साहाने आपला कारखाना चालवतील असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे. कामगारांना धन मानून त्यांची विधिवत पूजा करून त्यांचा यथोचित सन्मान करणा:या सातपुडा साखर कारखान्याचा हा अनोखा उपक्रम नक्कीच कामगारांना प्रोत्साहन देणारा तर आहेच अनुकरणीयही आहे.