पहिल्या दिवशी ४०० जणांना लस आजपासून लसीकरण ; जिल्ह्यात चार ठिकाणी केंद्रांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 01:16 PM2021-01-16T13:16:55+5:302021-01-16T13:17:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी ३ ठिकाण ड्राय रन घेण्यात आला होता. हा रन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी ३ ठिकाण ड्राय रन घेण्यात आला होता. हा रन यशस्वी झाल्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात हाेणार असून जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरण सुरु होणार आहे. दरम्यान पहिल्या दिवशी ४०० आरोग्य कर्मचा-यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय, म्हसावद ता. शहादा येथील ग्रामीण रुग्णालय आणि अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेतील कर्मचारींचे लसीकरण सुरु होणार आहे. शासनाकडून जिल्ह्यासाठी १२ हजार १४० कोव्हॅक्सीनचे डोस पाठवण्यात आले आहेत. यासाठी एकूण १० हजार ८५७ आरोग्य कर्मचारी, केंद्रीय आरोग्य यंत्रणेचे १४, फ्रंटलाईन वर्कर्स १ हजार ९७९ यांची नोंदणी करण्यात आली आहे. या लसीकरणासाठी ४० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दरदिवशी १०० नोंदणी झालेल्या आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी १८ वर्षावरील लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेतून दुर्धर आजारी, गरोदर व स्तनदा माता यांना वगळण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्रास झाल्यास कीट व रुग्णवाहिका तयार
लसीकरणाचा एकीकडे उत्साह असताना लसीकरणानंतर कर्मचा-यांना त्रास जाणवल्यास जिल्हा रुग्णालयात स्वंतत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक लसीकरण केंद्रावर संभाव्य लसीचा गुंतागुंतीच्या प्राथमिक उपचारासाठी एईएफआय कीट तयार करण्यात आल्या आहेत. या कीटच्या वापराबाबत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व लसीकरण केंद्रासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक लसीकरण केंद्रावर एईएफई झाल्यास त्या लस दिलेल्या कर्मचा-यास तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.