तळोदा येथे रानभाज्या महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:38 AM2021-09-16T04:38:18+5:302021-09-16T04:38:18+5:30
प्रसंगी बोलताना चैत्राम पवार यांनी सांगितले की, आपल्या अवती नैसर्गिक संसाधनांची कमी नाही. स्थानिक साधनसंपत्तीचा उपयाेग करून विकास साधता ...
प्रसंगी बोलताना चैत्राम पवार यांनी सांगितले की, आपल्या अवती नैसर्गिक संसाधनांची कमी नाही. स्थानिक साधनसंपत्तीचा उपयाेग करून विकास साधता येईल. आम्ही गाव संघटित केलं, गाव संघटित झालं तर खूप काही होऊ शकतं. ४८५ बांध बांधून गावातून वाहून जाणारं पाणी अडवलं, सामुदायिक वनसंवर्धनाचा प्रयोग ४५ गावांना सुरू केला. कोरोनासारख्या महामारीपासून रानभाज्या कामी येऊ शकतात. यातून रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते. कार्यक्रमास सिनेट सदस्य मनीष जोशी, राजेंद्र दहातोंडे यांनी रानभाज्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य संगीता वळवी, निशा पावरा, ॲड. संजय पुराणिक, विरसिंग पाडवी, प्राचार्य अजित टवाळे, सुधीरकुमार माळी, प्रवीण वळवी यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश पाडवी यांनी केले. सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य दादल्या पावरा यांनी तर आभार किशोर पावरा यांनी मानले.
महोत्सवात १५ वनधन विकास गटांच्या माध्यमातून १०० च्या जवळपास रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. यात बांबू कोंब, देहंदी, कंटुर्ले, देशी पडवळ, अंबाडी, खाटी भाजी, सिरीपान, खाटी भेंडी, कडवी भेंडी, केहवानी, बेहरा, अंबाडी पाने, अंबाडी फुले यांच्यासह इतर प्रकाराच्या रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती. गटातील महिला सदस्यांनी घरून भाज्या तयार करून आणल्या होत्या. या रानभाज्यांबरोबर मका, ज्वारी, मानी ज्वारी, बाजरी, जोंधळा यांच्या भाकरीचा आस्वाद मान्यवरांनी घेतला होता.