Vidhan Sabha 2019 : उमेदवार भेटीला आल्याचे मतदारांना होते अप्रूप..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:47 PM2019-10-04T12:47:58+5:302019-10-04T12:49:20+5:30
प्रा़.आय.जी़.पठाण । लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : मार्च 1972 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेसाठी निवडणूक लढलो. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती ...
प्रा़.आय.जी़.पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : मार्च 1972 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेसाठी निवडणूक लढलो. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतांना ही निवडणूक झाली होती. त्या काळी तालुक्यात ना रस्ते होते ना विजेची पुरेशी व्यवस्था. शिक्षणासह सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय व इतर विकासाची कामे देखील नव्हती. विसरवाडी ते नवापूर दरम्यान चार किलोमीटर लांबीचा खडीकरण झालेल्या रस्त्याचा भाग वगळता रस्ते नसल्याने प्रचारासाठी जीप गाडीने कच्चे रस्ते तुडवले. खांडबारा येथून जवळ असलेल्या नावली येथून प्रचाराची सुरुवात केल्याचे आजही आठवते. तेथे गेल्यावर गाव कारभारी यांची भेट झाली. रस्तेच नसल्याने तुम्ही इथवर कसे आलात? असा प्रश्न त्यांनी केला होता. मी निवडणूक लढवित असुन त्यासाठी भेटीला आल्याचे उत्तर दिले. त्यावर निवडणूक झाल्यावर तुम्ही विसरणार तर नाही? असा प्रती प्रश्न कारभारी यांनी केला, मी त्यातला नाही. निवडून आल्यावर सर्वप्रथम तुमच्या भेटीला येइन असे मी आश्वासित केले. तेथे दिवसभर थांबून आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. दुस:या दिवशी मोगराणी येथे गेलो. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला उमेदवार आल्याचे पाहुन प्रत्येक ठिकाणी लोकांना नवल वाटे. लोक उत्साही होउन भेट घेत असे. लोकांचा उत्साह पाहुन माझाही हुरुप वाढत गेला. लोकांनी 80 टक्के मला मतदान केले. 28 हजार 300 मतांच्या फरकाने मी निवडणूक जिंकलो व आश्वासन दिल्यानुसार सर्वप्रथम नावली येथे मतदारांच्या भेटीला गेलो. फटाके फोडुन जल्लोषात माङो स्वागत झाले होते. प्रचाराची संसाधने नसल्याने वाहन चालकास सोबत घेऊन एकटेच प्रचार करावा लागत असे. धुळे येथुन उपलब्ध करुन घेतलेले ध्वनिक्षेपक जीपच्या अग्रभागी बांधुन स्वत:च लोकांना संबोधित करुन स्वत:चा प्रचार केल्याचे आजही आठवते. विधानसभा सदस्य झाल्यावरही जळपास दोन वर्षे नवागाव ते नवापूर हे अंतर बैलगाडीने कापल्याचे आजही आठवते. त्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तालुक्यात सर्वप्रथम रस्ते उभारणीलाच प्राधान्य देऊन सर्व भागात खडीकरण व डांबरीकरण करुन रस्ते उभारलेत.
111 क्रमांकाची जीप ठरली लकी
ज्या जीप मधुन विधानसभा निवडणूकीचा प्रचार केला, त्या जीपचा क्रमांक 111 होता. कुठेही त्या जीपने साथ सोडली नाही की दगा दिला नाही. उलट ती जीप माज्यासाठी लकी ठरली. त्याच जीप मधुन प्रवास करीत पुढील दोन निवडणूका लढलो व जिंकलोही.