भाजपचे गट-तट एकत्र आल्याने विजय सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:01 AM2019-10-25T11:01:39+5:302019-10-25T11:01:45+5:30
सुनील सोमवंशी। लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-तळोदा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने आपली जागा कायम राखण्यात यश मिळविले तर ...
सुनील सोमवंशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा-तळोदा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने आपली जागा कायम राखण्यात यश मिळविले तर काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी यांना सलग दुस:यांदा पराभवाचा सामना करावा लागला.
शहादा-तळोदा मतदार संघाचा काय निकाल लागतो याची उत्सुकता संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याला लागून होती. भाजप-सेना युतीचे राजेश पाडवी या नवख्या उमेदवाराने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे माजी मंत्री असलेल्या अॅड.पद्माकर वळवींसमोर कडवे आवाहन उभे केले होते. याशिवाय सेवानिवृत्त अभियंता जेलसिंग पावरा यांनीही अपक्ष उमेदवारी करीत वळवी व पाडवींच्या अतितटीच्या लढतीत रंगत भरली होती. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पद्माकर वळवी यांचा फक्त 719 मतांनी पराभव झाला होता. या वेळी त्यांची लढत राजेश पाडवी या नवख्या उमेदवारांबरोबर असल्याने पद्माकर वळवी सहज विजयी होतील अशी काँग्रेसकडून शक्यात वर्तवण्यात येत होती. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजपात प्रवेश केल्याने आणि जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदशनामुळे राजेश पाडवींना मोठी ताकद मिळाली. याशिवाय नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक मकरंद पाटील, जि.प.सदस्य जयपाल रावल अशी मोठी फळी भाजपच्या बाजुने असल्यामुळे भाजपाचा विजय पक्का मानला जात होता. ही सर्व ताकद मिळाल्यामुळे राजेश पाडवी चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र अॅड.पद्माकर वळवी यांनी कडवी झुंज देत अवघा सात हजार 991 मतांचा विजयाचा फरक ठेवला.
या मतदार संघात तळोदा तालुक्यातील तीन उमेदवार होते तर शहादा तालुक्यातून अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा एकमेव उमेदवार असल्याने पावरांना याचा फायदा होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. तळोदा व शहादा तालुक्यात मतांची टक्केवारी सारखी असल्याने तसेच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त झाल्याने याचा फायदा कोणाला होतो याचीही उत्सुकता सगळ्यांना होती. शहादा तालुक्यात एक लाख 95 हजार 330 मतदारांपैकी एक लाख 27 हजार 386 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी तालुक्यातून राजेश पाडवी यांना 56 हजार 792 तर पद्माकर वळवी यांना 48 हजार 17 मते मिळाली. याचा अर्थ शहादा तालुक्याने राजेश पाडवींच्या विजयात मोठा सहभाग नोंदवला.
या तालुक्यानेच पाडवींना आठ हजार 775 चे मताधिक्य मिळवून दिल्यामुळे पाडवींचा विजयाचा मार्ग सुकर झाला. तळोदा तालुक्यातील एक लाख 25 हजार 79 मतदारांपैकी 81 हजार 877 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात पद्माकर वळवी यांना 38 हजार 493 मते पडली. तर राजेश पाडवींना 37 हजार 613 मते मिळाली. तळोदा हा पद्माकर वळवींचा जुना मतदार संघ असूनही येथून त्यांना केवळ 880 मतांचे मताधिक्य मिळाले. शहादा-तळोदा मतदार संघात काँग्रेस व भाजपच्या या तुल्यबळ लढतीत अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा यांनीही खूप चांगली लढत दिली. पावरा यांनी 21 हजार मते घेऊन तिसरे स्थान पटकावले. पावरा यांच्या मतांनीच ख:या अर्थाने पद्माकर वळवींच्या विजयाचे गणित बिघडवले, अशी चर्चा राजकीय वतरुळात सुरू झाली आहे. माकपचे उमेदवार जयसिंग माळी यांना अवघी चार हजार 59 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी यांना गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदेसिंग पाडवींसमोर पराभव पत्करावा लागला होता. तर या वेळी उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवींकडूनही त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.