नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या लढवणार - विजयकुमार गावित
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 10, 2023 06:30 PM2023-04-10T18:30:08+5:302023-04-10T18:32:20+5:30
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या लढवणार असल्याचे विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे.
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या निवडणुका भाजप लढणार आहे. पक्षाचे जे पदाधिकारी बैठकांना अनुपस्थित राहतात अशांना नव्याने आमंत्रित करणार नाही, त्यांनी पक्षात असल्याने बैठकीत येऊन भूमिका मांडावी, असे प्रतिपादन पालकमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी केले. शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मीरा प्रताप लाॅन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालकमंत्री डाॅ. गावित बोलत होते. प्रसंगी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया उपस्थित होते.बैठकीत खासदार डाॅ. हीना गावित यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, देशात बाजार समित्यांचे डिजिटलायजेशन करण्यात येत आहे. सातपुड्याचा डोंगर फोडून जिल्ह्यात नर्मदेचे पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.पालकमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करून योग्यरीत्या राबवला तर निश्चितच भविष्यातील चित्र बदलू शकते. बाजार समिती केवळ शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल खरेदी विक्रीसाठी नाही तर शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविणे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आहे. बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी सहाय्यकारी ठरतील यासाठी प्रयत्न करत आहे.