नर्मदा काठावरील गावांना विषारी सर्पाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:26 AM2019-08-27T11:26:40+5:302019-08-27T11:26:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा काठावरील थुवानी येथील शाळेतील दोन विद्याथ्र्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, नर्मदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नर्मदा काठावरील थुवानी येथील शाळेतील दोन विद्याथ्र्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, नर्मदा काठावरील शेलगदा, अठ्ठी, केली, थुवाणी या गावांमध्ये गेल्या काही वर्षात 70 पेक्षा अधीक जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य रतन पाडवी यांनी केली आहे.
प्रवीण रमेश वसावे (10), रोहित खिदार पाडवी (10) रा.अठ्ठी असे विद्याथ्र्याचे नाव आहे. दोन्ही विद्यार्थी थुवाणी येथील शाळेत शिकत होते. रात्री झोपले असतांना त्यांना सर्पदंश झाला. रात्रीच त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी धडगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत विद्याथ्र्याच्या पालकांना मदत जाहीर करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्यामुळे धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्याच्या फुगवटय़ामुळे कचरा व इतर घाणीसोबत सर्प देखील अशा ठिकाणी वाहून येत आहेत. शेलगदा, अठ्ठी, केली, थुवाणी या गावांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. या गावांमध्ये गेल्या काही वर्षात 70 पेक्षा अधीक जणांना सर्पदंश झाला आहे. त्यापैकी सहा ते सात जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्पदंशामुळे या भागात भितीचे वातावरण आहे. नर्मदा काठावरील गावांना संरक्षक भिंत बांधून मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी जिल्हा परिषदेत वेळोवेळी मागणी केली होती. पाठपुरावा देखील केला होता. परंतु उपयोग झाला नाही.
प्रशासन आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट पहाणार आहे असा सवाल पाडवी यांनी केला आहे.