जामली व उमटीतील ग्रामस्थ वीजसमस्येने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:16+5:302021-09-24T04:36:16+5:30
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील ...
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतील गावांमध्ये पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात साप, विंचू व जंगली श्वापदेदेखील नागरी वस्तीत शिरतात. सर्पदंशाच्या घटना नियमित घडत आहेत. तालुक्याच्या दुर्गम भागातील उमटी व जामली या दोन गावांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा रहिवास आहे. ही गावे गेल्या एक महिन्यापासून अंधारात आहे. वीज कंपनीने याठिकाणी योग्य कार्यवाही करून वीजसमस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
येथील ग्रामस्थांकडून मोलगी येथील महावितरण कार्यालयात संपर्क करत समस्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून कारवाई करण्याची मागणी अभियंता कविराज तडवी, पान्या तडवी, मालजी तडवी, संपत तडवी, कालुसिंग तडवी, मुन्ना तडवी यांनी केली आहे.
विजेअभावी पिठगिरण्या बंद आहेत. त्यामुळे गावातील महिलांना ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ दळण्यासाठी अन्य गावांपर्यंत पायपीट करावी लागत आहे. मोबाइल चार्ज होत नसल्याने रात्री-बेरात्री आपत्कालीन संपर्क करणे शक्य होत नाही. शिवाय, या गावांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, वीजपुरवठा नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहेत.
या गावातील पालक व विद्यार्थ्यांनी मोलगी कार्यालयात संपर्क केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु, अपेक्षित दाबाने पुरवठा केला नाही. शेजारील गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत असल्याने याच गावांना सापत्न वागणूक का दिली जाते, असाही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिओचे मनोरे उभारण्यात आले आहे. परंतु, अपेक्षित वीजपुरवठाच होत नसल्याने ग्राहकांना सुविधा मिळत नाही. परिणामी, हे मनोरे कुचकामी ठरत आहे.