निसर्गाशी नाळ जोडणारी वाघदेव पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 11:56 AM2019-12-08T11:56:27+5:302019-12-08T11:56:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आधुनिकतेत जुन्या व आदर्श परंपरा लुप्त होत असल्या तरी सातपुड्यात जल, जंगल, हवा व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आधुनिकतेत जुन्या व आदर्श परंपरा लुप्त होत असल्या तरी सातपुड्यात जल, जंगल, हवा व सुर्यप्रकाश पूजेची प्रथा आजही टिकून आहे. निसर्गाशी संबंधित घटकांची पूजा केली जात असल्यामुळे सातपुड्यातील आदिवासी संस्कृती निसर्गाशी नाळ जुळणारी ठरत आहे.
जागतिकीकरणात होणाऱ्या विकासामुळे प्रत्येक समाजातील जुन्या रुढी लोप पावत आहे. आदर्श असूनही आताची मुले या परंपरांकडे फारसे वळत नाही. त्यामुळे जुन्या रुढी व परंपरांचे संवर्धन होण्याऐवजी अस्ताला आल्या आहे. परंतु या बाबीला धडगाव व मोलगीचा भाग काही अंशी अपवाद ठरत आहे. मुळात आदिवासी संस्कृती निसर्गाशी मिळती-जुळती असून ती पर्यावरणपूरक आहे. राहणीमानासह अन्न, वस्त्र, निवारा या सर्व बाबी निसर्गावर आधारित आहेत. शासनाच्या घरकुल योजनांमुळे उभारलेली काही घरे वगळता या भागातील घरे पूर्णत: लाकडी असून त्याचा पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होत नाही. पटेल तसे घराची जागा, आकार व लाकूड बदलता येते. संसारोपयोगी साहित्यांमधील बहुतांश साहित्य हे बांबूपासून तयार केलेले आढळून येते. जंगलातील विविध प्रकारचा पाला, फुले व फळे वर्षभरातील खाद्यपदार्थ म्हणून साठवून ठेवले जात आहे.
खाद्यसंस्कृतीसह तेथील आदिवासी बांधवांची कालगणना देखील सुर्य व चंद्रावरुन होत आहे. शिवाय निसर्गावर आधारित नावाने स्वतंत्र महिने देखील आहेत. या महिन्यांनुसार वेगवेगळे सण-उत्सव देखील साजरी होत आहे. या उत्सवात प्रामुख्याने वाघदेव, निलीचाराय, गावदेवती, नवाय, डोगरी दिवाली, आठीवटी, गावदिवाली, याहा मोगी माता यात्रा, ओली (होळी) या सण-उत्सवांचा समावेश होतो. याशिवाय खळेपूजन, दुठल, इंंदल या पूजांचाही उल्लेख करता येतो. हे सर्व उत्सव दरम्यान हवा, पाणी, अन्न, जंगल व सुर्यप्रकाश यांची पूजा केली जात असल्याने निसर्गावर आधारित पूजा असल्याचे म्हटले जात आहे.
काही सण-उत्सव साजरे करताना ग्रामस्थांना पंगत देखील दिली जाते. या पंगतीसाठी लागणारे खर्च, अन्न, लाकुड व अन्य बाबी लोकसहभागातून उभारला जातो. सद्यस्थितीत धडगाव, मोलगी भागात गाव दिवाळी साजरी होत आहे. याची पंचमंडळीमार्फत काही आधीच तयारी सुरू होत आहे. पंगतीसाठी पर्यावरणाला बाधा ठरणाºया प्लॅस्टिक, थर्माकॉलपासून निर्मित पत्रावळींचा वापर केला जात नसून परंपरेनुसार सागाची पाने वापरली जात आहे. या पानांमुळे अन्नग्रहण करणाºयावर धोका ठरण्याऐवजी त्यातील औषधी गुणधर्म मिळत आहे. त्यामुळे ही बाब सुदृढ आरोग्यासाठी लाभदायक असून ही जीवनपद्धत अरोग्यासह पर्यावरणाचे रक्षण करणारी देखील ठरत आहे.
सातपुड्यात नैसर्गिक साधने वापरण्यास प्राधान्य देत आहे. घराबाहेर पडतांना प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये पाणी नेण्याऐवजी मटक्याच्या आकारातील दुधी भोपळ्यापासून निर्मित भांड्यात (तुंबडी) पाणी नेण्याची प्रथा आहे. आज प्लॅस्टिकमुळे जागतिक संकटे निर्माण झाली आहे. तसे तुंबडीमुळे झाले नाही. अल्युमिनीअम, लोखंडी भांड्यांऐवजी मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जातो. हा स्वयंपाक कसदार व चवदार असल्याचे आढळून येते. याशिवाय बहुतांश भांडी, संसारोपयोगी साहित्य निसर्गावर आधारित असल्याने तापमानवाढीसारखे विनाशकारी संकटे टाळले जात आहे.