महिनाभरातच लागली महामार्गाची ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:47 AM2020-07-16T11:47:49+5:302020-07-16T11:48:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा ते शिरपूर रस्त्याच्या कामाला महिनाही झाला नाही तोच पहिल्याच पावसात रस्त्याची दाणादाण उडाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा ते शिरपूर रस्त्याच्या कामाला महिनाही झाला नाही तोच पहिल्याच पावसात रस्त्याची दाणादाण उडाली आहे. अनरदबारी ते कहाटूळ फाटा रस्त्यावर तर महिनाभरात दोनवेळा खड्डे बुजवले तरी परत ‘जैसे थे’ स्थिती झाली. वडाळी ते तोरखेडा फाटापर्यंतचा रस्ताही ‘जैसे थे’ तैसे झाला असून वडाळी ते कहाटूळ फाटा रस्त्याची तर खूपच दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करूनही १५ दिवसातच रस्ता खराब होतो म्हणजे काम किती निकृष्ट होत असेल याची प्रचिती येते.
गेल्या दोन वर्षापासून शहादा-शिरपूर महामार्गाची खूपच दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे शासनाने लाखो रुपये मंजूर करून महामार्ग दुरुस्तीला मंजुरी दिली. परंतु दुरुस्तीही अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहे. वाहनधारकांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने अवजड वाहनांचे प्रमाणही कमी आहे.
नजीकच्या गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येत असल्याने या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी ही या विभागाची आहे. मात्र हा विभाग हा सुस्त आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी या विभागाने अजब प्रकार सुरु केला आहे. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात माती टाकून ते बुजवण्यात येत आहेत. खड्ड्यांमधील तीच माती पुन्हा पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वार घसरुन पडल्याने अनेकांना गंभीर दुखापत झाली तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. शहादा ते शिरपूर रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी नदी व नाले असल्याने पूल व फरशी बांधण्यात आली आहेत. मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून काही पुलावरील कठडेच गायब झाले आहेत. तर काही ठिकाणी पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळेदेखील काही दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोयीस्करपणे डोळेझाक केल्याने वाहनधारकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असेच यावरुन दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहे.