नंदुरबारात पहिली व आठवीच्या पुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:45 PM2018-06-02T12:45:06+5:302018-06-02T12:45:06+5:30
दोन लाख 33 हजार विद्यार्थी : 72 टक्के पुस्तकांचा पुरवठा, पहिल्या दिवशी वाटपाचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पहिली व आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे पुस्तकांची छपाई उशिरा झाली. परिणामी या दोन वर्गाची पुस्तके अद्यापही उपलब्ध झालेली नसल्याचे चित्र आहे. यामुळे आतार्पयत 72 टक्के पुस्तके प्राप्त झाली आहेत. दरम्यान, यंदा दोन लाख 33 हजार 645 विद्याथ्र्यासाठी 12 लाख 19 हजार 661 पुस्तके नोंदविण्यात आली आहेत.
सर्व शिक्षा अभियानतर्फे दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्याथ्र्याना मोफत पाठय़पुस्तके पुरविण्यात येतात. या वर्गातील कोणताही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला केवळ पुस्तकांअभावी शिक्षणात अडचणी येऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठय़पुस्तक ही योजना सुरू केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्याथ्र्याना मोफत पुस्तके पुरविण्यात येणार आहे.
दोन महिने आधी मागणी
शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दोन महिने आधीपासून पुस्तक संचाची नोंदणी करावी लागत असते.
यंदा पाठय़पुस्तके मंडळाने थेट ऑनलाइन पद्धतीने मागणी नोंदविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुकास्तरावरून ऑनलाइन मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे यंदा वेळेवर पुस्तके पोहचतील व विद्याथ्र्याना मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे.
संख्या वाढली
यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 टक्के जादा पुस्तकांची मागणी करण्यात आली होती.
यंदा दोन लाख 33 हजार 645 विद्याथ्र्याकरिता पुस्तक मागणी करण्यात आली आहे.
त्यात पहिली ते पाचवीच्या एक लाख 49 हजार 474 विद्यार्थी, तर सहावी ते आठवीच्या 84 हजार 171 विद्याथ्र्याचा समावेश आहे.
नंदुरबार तालुक्यात 72.11 टक्के, नवापूर तालुक्यात 53.80, शहादा तालुक्यात 90.19, तळोदा तालुक्यात 54.71, अक्कलकुवा तालुक्यात 60.19, धडगाव तालुक्यात 85.02 टक्के अशी एकूण 72.02 टक्के पुस्तके उपलब्ध झाली आहेत.
थेट गटसाधन केंद्रात
यंदापासून थेट पुण्याहून तालुकास्तरावर गटसाधन केंद्रात पुस्तके पोहच करण्यात आली आहेत. नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत ही पुस्तके वाहतूक केली गेली आहे. पूर्वी जिल्हास्तरावर पुस्तके येत होती. तेथून तालुकास्तरावर नेली जात होती. त्यात वेळ व पैसाही खर्च होत होता.