पारंपरिक होलिकोत्सवासाठी सज्ज असलेल्या काठी गावाला निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:40 AM2019-03-07T11:40:12+5:302019-03-07T11:40:27+5:30
नंदुरबार : आगामी १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या काठीच्या होळीची तयारी सध्या उत्साहात सुरु आहे़ गेल्यावर्षी पर्यटन विभाग आणि जिल्हा ...
नंदुरबार : आगामी १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या काठीच्या होळीची तयारी सध्या उत्साहात सुरु आहे़ गेल्यावर्षी पर्यटन विभाग आणि जिल्हा परिषद यांंनी निधी देऊन काहीअंशी होलिकोत्सावाला हातभार लावल्याने पर्यटकांना सोयीचे झाले होते़ परंतू यंदा मात्र निधीची कोणतीही तरतूद नसल्याने येथील विकासकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
शेकडो वर्षांची परंंपरा असलेल्या काठीची राजवाडी होळी पर्यटकांसाठी पर्वणी असते़ गेल्या पाच वर्षात ग्लोबल स्वरुप प्राप्त झाल्याने येथे देशभरातील पर्यटक येऊ लागले आहेत़ पर्यटकांसोबत गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी गेल्यावर्षी विविध विकास कामे होळी उत्सवापूर्वी पूर्ण झाली होती़ परंतू यंदा मात्र कोणत्याही प्रकारचा निधी मिळाला नसल्याने प्रस्तावित रस्त्याच्या कामांना खीळ बसल्याचे चित्र आहे़ काठी गावातील राजवाडी होळी पेटवण्यात येणाऱ्या मुख्य चौकापासून दर्गा व तेथून राममंदिर चौकापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासह शौचालयांची निर्मिती व होळीचे दृश्य दूरवर थांबलेल्या आदिवासी बांधवांना दिसावे म्हणून चांगल्या दर्जाचे तात्पुरते एलईडी स्क्रीन्स बसवणे आदींसह विविध बाबींसाठी निधीची अपेक्षा करण्यात येत आहे़ १५ दिवसांवर उत्सव येऊन ठेपल्याने कामे पूर्ण होण्याची गरज होती़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील मोठ्या उत्सवापैकी एक उत्सव असून, त्याच्या तयारीचा आढावा घेण्याबाबत प्रशासन उदासिन असल्याचे दिसून आले.