कुपोषित बालकांनाही दवाखान्यात बेडसाठी ‘वेटिंग’, कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी बेड आरक्षित, संतापजनक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:00+5:302021-07-15T04:22:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे सक्षम आरोग्य सेवेचा सर्वत्र बोलबाला झालेल्या नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांनाच उपचारासाठी रूग्णालयात बेड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे सक्षम आरोग्य सेवेचा सर्वत्र बोलबाला झालेल्या नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांनाच उपचारासाठी रूग्णालयात बेड मिळण्याकरिता ‘वेटिंग’ असल्याची संतापजनक बाब समाेर आली आहे. विशेष आरोग्य मोहिमेमुळे कुपोषित बालकांची संख्या प्रचंड वाढल्याने पोषण पुनर्वसन केंद्रे फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी रुग्णालयांमध्ये आतापासूनच बेड आरक्षित करण्यात आल्याने कुपोषित बालकांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या कुपोषित बालकांसाठी विशेष आरोग्य मोहीम सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या चार तालुक्यांतील ९४ हजार ९२ बालके तपासण्यात आली असून, त्यात अतितीव्र कुपोषित दाेन हजार ४५२, तर मध्यम कुपोषित १२ हजार ७९ बालके आढळून आली आहेत. अर्थात अद्यापही निम्म्या बालकांची तपासणी बाकी असल्याने हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे.
तपासणी सुरू असताना अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये अनेक बालके गंभीर स्वरूपात आजारी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य पोषण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कोरोनामुळे हे केंद्र आतापर्यंत अर्थात दोन महिन्यांपूर्वीपर्यंत बंद होते. त्याठिकाणी काही केंद्रांमध्ये कोरोनाचे रुग्ण दाखल केले होते. मात्र ‘लाेकमत’ने वृत्त देताच ही केंद्रे पुन्हा कुपोषित बालकांसाठी सुरू करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी एकही बालक नसलेली ही केंद्रे आता फुल्ल झाली आहेत. या केंद्रांमध्ये कुपोषित बालकांना दाखल करण्यासाठी जागाच नसल्याने अनेक बालकांना वेटिंगसाठी केवळ त्याची नोंदणी करण्यात आली आहे. जागा उपलब्ध होताच तुम्हाला बोलविण्यात येईल, असे संबंधित पालकांना व आशा सेविकेला सांगितले आहे.
पोषण केंद्रात जागा नसली तरी, रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या जनरल हॉलमधील बेड देऊन कुपोषित बालकांना दाखल करून घेण्याची पालकांची अपेक्षा होती. मात्र संबंधित बेड संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरक्षित करण्याच्या प्रशासनाच्या सूचना असल्याने त्या बेडवर कुपोषित बालकांना उपचारासाठी दाखल करता येणार नाही, असे उत्तर संबंधित वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे एकूणच या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण केंद्रात केवळ १० बेड आहेत. मात्र, तेथे १२ बालकांना दाखल केले आहे. जागा नसल्याने बेड उपलब्ध होताच संबंधित बालकांना दाखल करून घेण्यात येईल. रुग्णालयातील काही बेड कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
- गणेश पवार, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा.
अनेक बालके वेटिंगवर
कुपोषणामुळे अनेक बालके गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मुळातच या बालकांना योग्य आरोग्य सेवा व उपचार न मिळाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा स्थितीत या बालकांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्याऐवजी संभाव्य लाटेची प्रतीक्षा करीत रुग्णालयातील बेड आरक्षित करून ठेवणे हा निश्चितच संतापजनक प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने आधीच अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे.