दोन वर्षापासून राजीनामा मंजुरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:54 AM2017-09-02T11:54:32+5:302017-09-02T11:54:32+5:30
तळोदा उपजिल्हा रुग्णालय : लालफितीच्या दिरंगाईचा महिला वैद्यकीय अधिका:यालाही अनुभव
वसंत मराठे ।
ऑनलाईन लोकमत
तळोदा : ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ अशी म्हण लालफितीच्या दिरंगाईमुळे रुढ झाली आहे. या लालफितीच्या दिरंगाईचा अनुभव शासनाच्या सेवेत राहिलेल्या एका महिला वैद्यकीय अधिका:यालादेखील येत आहे. कारण त्यांनी आपल्या खाजगी कारणामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी सेवेचा दिलेला राजीनामा अजूनही संबंधित विभागाकडून मंजूर झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या या उदासिन धोरणाबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील डॉ.निशात रंगरेज या वैद्यकीय अधिकारी म्हणून सप्टेंबर 2014 मध्ये तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांची बालरोग तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली होती. रुग्णालयात सात-आठ महिने सेवा केल्यामुळे नंतर त्यांनी खाजगी कारणामुळे एप्रिल 2015 मध्ये रुग्णालयातील प्रमुख अधिका:यांकडे राजीनामा सादर केला. शिवाय राजीनामा जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देखील पाठविला. येथील वैद्यकीय अधीक्षकांच्या सांगण्यानुसार खुद्द त्यांनी त्याचवेळेस आरोग्य संचालक मुंबई यांनाही प्रत्यक्ष राजीनामा सादर केला होता. असे असताना संबंधित विभागाने अजूनही या महिला वैद्यकीय अधिका:यांचा राजीनामा मंजूर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाकडे विचारले असता आरोग्य विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी संबंधित डॉक्टरांचा राजीनामा पाठविला आहे. मात्र अजूनही तसे पत्र आपल्याकडे प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर कागदोपत्री अजूनही त्या कार्यरत असल्याचे दाखविले जात आहे.
वास्तविक संबंधित महिला डॉक्टरांनी राजीनामा देऊन जवळपास दोन सव्वा दोन वर्षे झाले आहेत. असे असताना आरोग्य विभाग त्यांचा राजीनामा का मंजूर करीत नाही, असा सवाल उपस्थित होऊन या विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजीचा सूर आहे.