वाल्हेरी धबधबा पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:25 PM2020-07-21T12:25:10+5:302020-07-21T12:25:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : पर्यटकांचे खास आकर्षण असणारा तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा वाहायला सुरू झाली आहे. मात्र वर्षानुवर्ष ...

Walheri Falls neglects tourism development | वाल्हेरी धबधबा पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष

वाल्हेरी धबधबा पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : पर्यटकांचे खास आकर्षण असणारा तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा वाहायला सुरू झाली आहे. मात्र वर्षानुवर्ष या पर्यटन स्थळांच्या विकासाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम पावणारा व जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला वाल्हेरी येथील धबधबा हा जिल्ह्यासह शेजारील गुजरात राज्यातील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, युवकांची पाऊले या पर्यटन स्थळांकडे वळू लागतात. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी धबधबा वाहण्यास सुरूवात झाली आहे.
यावर्षी कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे असणारे लॉकडाऊन व सुरक्षितता म्हणून घराबाहेर न पडणे, यामुळे सर्व नागरिक गेल्या चार महिन्यांपासून घरातच बंद आहेत. दरवर्षी मे महिन्यात सुट्यांमध्ये परिवारासह फिरायला जाणाऱ्यांनादेखील यावर्षी कुठेही पर्यटनासाठी बाहेर जाता आलेले नाही. अश्या परिस्थितीत स्थानिक पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. अनेक जण आपल्या परिवारासह सातपुड्यात भ्रमंती करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा सातपुड्याच्या पायथ्याशी तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असताना या पर्यटन स्थळाचा विकास अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे.
तळोदा शहरापासून सुमारे २० किमी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी वाल्हेरी हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून कोणताही विकास झाला नसल्याने येणाºया पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. धबधब्यापर्यंत पर्यटकांना सहज पोहचायला मदत व्हावी यासाठी साधे दिशादर्शक फलकदेखील नसल्याची स्थिती आहे. धबधब्यापर्यंत पोहचायला चांगल्या स्थितीतील रस्तादेखील आहे. सोयीसुविधासह या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजनादेखील नाही. या धबधब्यात अनेक तरूणांचे बळीदेखील गेले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसुविधासह सुरक्षिततेच्या दृष्टीने यापर्यटन स्थळाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, हे पर्यटनस्थळ वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने २०१५-२०१६ मध्ये तळोद्याचे तत्कालीन वनसंरक्षक अशोक पाटील यांनी वन विभागाच्या वतीने या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी वाल्हेरी पर्यटनस्थळ विकासाचा प्रस्ताव तयार करून राज्याचे प्रधान वनसंरक्षक यांच्याकडे पाठपुरावा करून या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ४० लाखांच्या निधी प्रस्तावाला वनविभागाकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली होती. मात्र यासाठी प्रत्यक्ष पैसाच मिळाला नसल्याने कोणत्याही प्रकारच्या विकासाचे काम या पर्यटन स्थळाचे हाऊ शकले नसल्याचे सांगितले जाते. यानंतर एप्रिल २०१७ मध्ये पुन्हा आमदार उदेसिंग पाडवी यांच्या पाठपुराव्यानुसार येथील वनविभागाने ५६ लाख ४७ हजारांचा प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे पाठविला होता. यानंतरदेखील हे पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होऊ शकली नाही. पाच ते सहा वर्षांपूर्वी असुविधेच्या बाबतीत जी स्थिती होती, तीच आजही आहे. या पर्यटन स्थळाच्या विकास झाल्यास स्थानिकांनादेखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Walheri Falls neglects tourism development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.