भूगर्भात केवळ २० फुटांवर मिळते पाणी; जलपुनर्भरणाकडे मात्र नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:02+5:302021-07-15T04:22:02+5:30

नंदुरबार : शहर आणि परिसरात यंदा पावसाने हजेरी दिली नसल्याने चिंता वाढल्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक ...

Water is available only 20 feet underground; Citizens' back to water recharge, however | भूगर्भात केवळ २० फुटांवर मिळते पाणी; जलपुनर्भरणाकडे मात्र नागरिकांची पाठ

भूगर्भात केवळ २० फुटांवर मिळते पाणी; जलपुनर्भरणाकडे मात्र नागरिकांची पाठ

Next

नंदुरबार : शहर आणि परिसरात यंदा पावसाने हजेरी दिली नसल्याने चिंता वाढल्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहर आणि परिसरातील भूजल पातळी ही ६ मीटरने वर आली असून शहरात कोणत्याही भागात बोअर केल्यास अवघ्या २० ते २२ फुटांवर पाणी लागत आहे. असे असले तरी पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी होणारे रूफटाॅप हार्वेस्टिंग अर्थात जलपुनर्भरण मात्र टाळले जात आहे.

नंदुरबार शहराचा विस्तार हा चहूबाजूने वाढला आहे. धुळे रोड, तळोदा रोड, कोरीट रोड, साक्री नाका, बायपास रोड, होळ तसेच पातोंडा हद्दीलगत वसाहती विस्तारल्या आहेत. शहरातील धुळे राेड परिसरात उंच सखल भाग असल्याने या भागात बोअरिंग केल्यास पाणी ५० किंवा ७० फुटांपर्यंत लागत असल्याचे दिसून आले आहे. तर बायपास रोडलगत वसाहतींमध्येही उंचवटा असल्याने पाणी मिळवण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे इतर भागात मात्र उतार असल्याने त्या ठिकाणी बारमाही पाणीसाठा आहे. नगरपालिकेकडून एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विरचक धरणातही सध्या मुबलक साठा आहे.

धुळे रोडला सर्वाधिक बोअरवेल आहेत. या भागात ५० फुटांपेक्षा अधिक खोली केल्यानंतर पाणी लागत आहे.

उंच टेकड्या आणि खडकाळ जमीन असल्याने या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. पाणी सखल भागात वाहून जाते.

ही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी जलपुनर्भणाचे महत्त्व जाणून घेणे अपेक्षित असतानाही कारवाई होत नाही.

शहरातील उड्डाणपुलाच्या पलीकडे मुबलक पाणी

शहराच्या उत्तर-पूर्व भागातील तळाेदा रोड, नळावा रोड, कोरीट रोड या भागात मुबलक पाणीसाठा असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी २० ते २२ फुटांपेक्षा अधिक खोदकाम न करताही पाणी लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून बोअरवेल करताना पाइपांचा वाढीव खर्च करावा लागत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या भागालगत ग्रामीण हद्दीतील वसाहतीतही मुबलक पाणी आहे.

कोणीही यावे बोअरवेल खोदावे

घराच्या बांधकामाला परवानगी लागते. परंतु बोअरवेल खोदण्यास परवानगी लागत नाही.

यासाठीची परवानगी भूजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु संबंधित विभागाने मात्र त्यास नकार दिला.

त्यामुळे कोणत्या भागात किती बोअरवेल आहेत याची अद्ययावत आकडेवारी मिळू शकली नाही.

जलपुनर्भरणाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता नाही. मातीचा भाग कमी होऊन काँक्रिटीकरण झाले असल्याने रुफ वाॅटर हार्वेस्टिंग वाढले पाहिजे. बांधकाम करतानाच तशी सोय केली पाहिजे. जमिनीत जाणारे हे पाणी त्यांनाच परत मिळेल.

- आर.ओ.भगमार, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग, नंदुरबार

जमिनीत पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी जलपुनर्भरण होणे गरजेचे आहे. केवळ शहरच नव्हे तर शहराला लागून ग्रामीण हद्दीतील वसाहतींमध्येदेखील जलपुनर्भरण वाढले पाहिजे. यातून नागरिकांना पावसाचे जमिनीत गेलेले पाणी परत मिळून टंचाई दूर होईल. -

दिग्विजय राजपूत, नंदुरबार

Web Title: Water is available only 20 feet underground; Citizens' back to water recharge, however

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.