पिकांसह पाणीपुरवठय़ालाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 10:55 AM2017-08-11T10:55:14+5:302017-08-11T11:03:54+5:30
सारंगखेडा बॅरेज : दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्याने बॅरेज व नदीपात्रात अल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणा:या ज्ॉकवेल व इलेक्ट्रीक मोटारींना पाणी उपलब्ध होत नसल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने पिके वाचविण्यासाठी शेतक:यांची कसरत सुरू आहे.
सारंगखेडा व परिसरात जून महिन्यात 7 व 8 तारखेला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र श्रावण सरीच बरसल्या. अद्यापही या भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा आतार्पयतच्या पावसाळ्यात कोणतेही नदी-नाले वाहून निघाले नाहीत. त्यातच 15 दिवसांपासून सारंगखेडा बॅरेजचे सर्व 26 दरवाजे उघडण्यात आल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिसरात जोरदार पाऊस नसल्याने बागायती व कोरडवाहू क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतक:यांनी तापी नदीवर इलेक्ट्रीक मोटारी ठेवून पाईपलाईनद्वारे शेतार्पयत पाणी नेले आहे. मात्र तापी नदीचे पात्र कोरडे झाल्याने पाणी उपलब्ध होत नाही. बागायती पिकांना पाणी देणे आवश्यक असताना पाणी मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. बॅरेजचे दरवाजे उघडण्याच्या शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतक:यांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
तापी काठावरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सारंगखेडा बॅरेजच्या साठवून ठेवलेल्या पाण्यातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र बॅरेजमध्ये व नदीपात्रात दरवाजे उघडल्यामुळे पाणीसाठा नसल्याने या गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तर शेतक:यांना पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असून तापी नदीचे पात्र कोरडे पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अध्र्या नंदुरबार जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. त्यामुळे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजसमध्ये तरी थोडाफार पाणीसाठा व्हावा म्हणून पालकमंत्री रावल यांनी संबंधित विभागांना तातडीने बॅरेजेसचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.