कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांवर पाणीटंचाई
By admin | Published: February 5, 2017 12:34 AM2017-02-05T00:34:39+5:302017-02-05T00:34:39+5:30
पाण्यासाठी भटकंती : अशुद्ध पाण्याचा वापर, उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज
शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीच्या सात पाडय़ांवर कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ज्या बंधा:यावर गुरे पाणी पितात त्या पाण्याचा वापर ग्रामस्थ करीत आहेत. आहे. संबंधित विभागाच्या अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उन्हाळा सुरू होण्याअगोदरच उपाययोजना करण्याची मागणी होत असून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीतील डेमच्यापाडा, भेंढय़ावड, केवडीपाणी, धजापाणी, अंबापाणी, सातपिंप्री, मिठापूर आदी पाडय़ांवर 300 ते 450 आदिवासी कुटुंवांचे वास्तव आहे. हातमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करतात. कन्साई गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर ही पाडे असल्याने येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्योत्तर काळापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
या पाडय़ांच्या परिसरात नदी-नाले, तलावाचे अस्तित्व नसल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही भक्कम सुविधा उपलब्ध नाही. या पाडय़ांवरील प्रत्येक कुटुंबास शेतातून अथवा खोदलेल्या खड्डय़ांमधून पाणी उपसावे लागते. ढेमच्यापाडा येथे 75 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी एकच हातपंप आहे. या हातपंपावरही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. तसेच भेंडय़ावड येथे 25 कुटुंब आहेत याठिकाणीही एक हातपंप आहे. मात्र येथील हातपंप वनविभागाकडून बंद करण्यात आल्याने या कुटुंबांना जवळील रतनपूर येथून पाणी आणावे लागते.
धजापाणी येथेही 40 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाण्यासाठी विंधन विहीर आहे. मात्र पुरेशा प्रमाणात पाणी नाही. तसेच अंबापाणी येथे 80 कुटुंब राहात असून खाजगी विहीर आहे. याठिकाणी आरोग्याचाही प्रश्न गंभीर असल्याचे बोलले जाते. सातपिंप्री येथे 30 कुटुंबांचे वास्तव्य असून याठिकाणी पाणी असून नसल्यासारखे असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येतो. मिठापूर येथेही हातपंप आहे मात्र तो नादुरुस्त असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एकंदरीत, आदिवासी पाडय़ातील कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करण्याकरिता जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट नाला बांधकाम करून पाण्याचा साठा होणार आहे. तसेच काही ठिकाणी मोठमोठय़ा खड्डय़ांमध्ये पाणीपुरवठा जेमतेम असून हे पाणी गुरेढोरे पितात. त्याच पाण्याचा वापर ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हिवाळा संपण्यापूर्वी या पाडय़ांवरील नागरिकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा मनलेश जयस्वाल, मदन पावरा, जयराम पटले, लिंबा पाडवी, रमेश वळवी, कांतीलाल पावरा, भूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
(वार्ताहर)
कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत येणा:या सात पाडय़ांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या प्रशासनाने येत्या काही दिवसात सोडविली नाही तर या पाडय़ांमधील मतदार येणा:या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकतील.
-लिंबा रामा पाडवी, ग्रामस्थ, डेमच्यापाडा
गुरेढोरे ज्या ठिकाणी पाणी पितात तेथील पाण्याचा वापर या पाडय़ांमधील ग्रामस्थांना करावा लागतो. पाणी समस्या न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल. -मनलेश जयस्वाल