सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:48 AM2017-09-02T11:48:10+5:302017-09-02T11:48:10+5:30
गेल्या आठवडय़ातील पावसाचा परिणाम : रब्बी हंगामाला होणार फायदा
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार : गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. असे असले तरीही दहा लघु प्रकल्पांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 12 प्रकल्प पुर्णपणे भरले असून एकुण 64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे किमान रब्बी हंगामाला तरी त्याचा फायदा होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाचा अनियमितपणा आहे. आधीच जून महिन्यात उशीराने पाऊस झाला. जुलै महिन्यातील सरासरी देखील पुर्ण झाली नाही. ऑगस्ट महिन्यात ब:यापैकी हजेरी लावल्याने पावसाची टक्केवारी वाढली. सध्या 77.63 टक्के सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ब:यापैकी असून गेल्यावर्षाच्या तुलनेत पाच टक्के तूट मात्र कायम आहे.
शहादा, नवापूर तालुके कोरडे
यंदा देखील शहादा व नवापूर तालुक्यावर वरुणराजा मेहरबान नसल्याची स्थिती आहे. सर्वात कमी पजर्न्यमान शहादा तालुक्यात सरासरीचा अवघा 56.41 टक्के पाऊस झाला आहे. तर नवापूर तालुक्यात 66.70 टक्के पाऊस झाला आहे. याउलट सर्वाधिक पाऊस हा धडगाव तालुक्यात 99.55 टक्के झाला आहे. धडगाव तालुका सरासरी भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. याशिवाय तळोदा तालुक्यात 83.99 तर नंदुरबार तालुक्यात 82.97 टक्के पाऊस झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यात 79.35 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टअखेर सरासरीचा 540.58 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा 647.67 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी दोन तालुक्यांची सरासरी पाच टक्क्यांनी कमीच असल्याचे चित्र आजही कायम आहे.
पाणीसाठा वाढला
गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात एकुण 37 लघु व चार मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस असून त्या माध्यमातून शेती सिंचनाची व्यवस्था केली जाते.
सध्या लघु प्रकल्पांमध्ये 68.26 तर मध्यम प्रकल्पांमध्ये 62.73 टक्के पाणीसाठा आहे. एकुण दोन्ही प्रकल्प मिळून 64.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. याशिवाय शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प देखील पुर्णपणे भरला आहे. राणीपूर प्रकल्पात 60.67 टक्के पाणीसाठा आहे. विरचक प्रकल्पात 40.71 टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्वच प्रकल्पांमध्ये किमान पाच ते 20 टक्के पाणीसाठय़ाची वाढ गेल्या आठवडय़ाभरात झाली आहे.
शहादा व नवापूर तालुक्यातील अनेक प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या दोन्ही तालुक्यातील आठपेक्षा अधीक प्रकल्पात 25 टक्कपेक्षा कमी पाणीसाठा आहे. याउलट नंदुरबार, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यात नियमित पावसाळा आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातील परतीचा पाऊस यामुळे पावसाची टक्केवारी आणखी वाढून किमान प्रकल्पातील पाणीसाठय़ात देखील वाढ होण्याची शक्यता आहेच.
रब्बीला फायदा
या पाणीसाठय़ाचा फायदा रब्बी पिकांना होतो. त्यामुळे शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरी 76 टक्के पाणीसाठा झाला होता. जानेवारीअखेर या पाणीसाठय़ाचा उपयोग रब्बी पिकांसाठी केला जात असतो. मात्र, उन्हाळ्यात प्रकल्पांमध्ये ठणठणाट असतो.