२० गावांना टँकरने पाणी पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:27 AM2019-03-19T11:27:57+5:302019-03-19T11:28:07+5:30

प्रशासनाकडून निविदा : मागणी वाढण्याची शक्यता, खाजगी टँकर चालकांचा धंदा तेजीत

Water supply to 20 villages by tanker | २० गावांना टँकरने पाणी पुरवठा होणार

२० गावांना टँकरने पाणी पुरवठा होणार

Next

नंदुरबार : तीव्र पाणी टंचाईच्या जिल्ह्यातील २० पेक्षा अधीक गावांमध्ये पुढील महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने टँकर पुरवठादारांकडून निविदा देखील मागविल्या आहेत. जवळपास १५ वर्षानंतर जिल्ह्यात टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, ज्या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहीत केल्या आहेत त्या देखील आटू लागल्याने अशा गावांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची भिषण स्थिती आहे. जवळपास २०० पेक्षा अधीक गावे पाणी टंचाईने होरपळत आहेत. या गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टंचाईच्या तिसऱ्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढणार असून त्यादृष्टीने प्रशासनातर्फे उपाययोजनांना सुरूवात करण्यात आली आहे.
टँकर सुरू होणार
जिल्ह्यात गेल्या १५ वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नव्हती. भौगोलिक कारणांमुळे दरवर्षी केवळ धडगाव तालुक्यातील गौऱ्याचा बोदलापाडा येथे उन्हाळ्याचे दोन महिने टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदा देखील या गावाला टँकर सुरू करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील इतर कुठल्याही तालुक्यात पाणी स्त्रोत नसल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागल्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा म्हणून जिल्ह्याला बिरुद लागले होते. परंतु यंदाचा दुष्काळ भिषण असल्यामुळे २० पेक्षा अधीक गावांना एप्रिल महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. मे महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निविदा मागविल्या...
टँकरने पाणी पुरवठा करण्याची बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतीच निविदा देखील काढली आहे. वेगवेगळ्या लिटर क्षमतेच्या टँकरचे प्रस्ताव मागविले आहेत. गावाच्या लोकसंख्येनुसार त्या त्या क्षमतेच्या टँकरची निविदा स्विकारण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
विहिरी, कुपनलिका आटल्या
जिल्ह्यातील ६० पेक्षा अधीक गावांमध्ये खाजगी विहिरी व कुपनलिका अधिग्रहीत करून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता या गावांमधील अधिग्रहीत कुपनलिका आणि विहिरीही आटू लागल्या आहेत.
त्यामुळे पुर्वी दीड ते दोन तास उपसा होणारे पाणी आता जेमतेम अर्धातासपर्यंत उसपा होत आहे. पुढील काळात ते देखील कमी होणार असल्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे.
वसाहतींमध्ये आधीपासूनच सुरू
शहरालगत असलेल्या अनेक वसाहतींमध्ये जानेवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात होळ शिवार, वाघोदा शिवार, दुधाळे शिवारातील वसाहतींचा समावेश आहे. या वसाहतींमध्ये किमान ३०० ते ५०० रुपये प्रमाणे टँकर मागवावे लागत आहे. तालुक्यातील भालेर, तिशी, उमर्दे या गावांमध्ये देखील ग्रामस्थ टँकरने पाणी विकत घेत आहेत.

Web Title: Water supply to 20 villages by tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.