धनपूर धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:56+5:302021-09-18T04:32:56+5:30
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या धनपूर धरणाच्या पाण्यावर शेतकरी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेती करतात. प्रामुख्याने ...
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या धनपूर धरणाच्या पाण्यावर शेतकरी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेती करतात. प्रामुख्याने कूपनलिकांची पाणीपातळी तसेच विहिरींची पातळी स्थिर राहत असल्याने बागायती पिकांसोबत बारामाही शेतीला या भागात चालना मिळत आहे. दरम्यान, तळोदा तालुक्यातील इतर गावांना या प्रकल्पातून पाणी मिळावे, यासाठी पाटचारी व कालवा निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे अद्यापही पडून आहे. शासनाकडून यासाठी निधी मंजुरी दिल्यास तालुक्यातील ५०० हेक्टर जमिनीपर्यंत थेट पाणी पोहोचून कोरडवाहू शेतीतही बारामाही पिके घेणे शेतकऱ्यांना सोपे जाणार आहे.
याबाबत नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता के. बी. पावरा यांना संपर्क केला असता, शासनाकडे पाटचारी तसेच कालवा निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला सुरुवात करून तालुक्यातील जमीन सिंचनाखाली आणली जाणार आहे.