जिल्ह्यात शत-प्रतिशत काँग्रेस आणण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:41 PM2020-11-23T12:41:55+5:302020-11-23T12:42:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या बाजूने काैल लागेल याची खात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या बाजूने काैल लागेल याची खात्री आहे. काँग्रेससोबत भाजपाचेही काही मतदार आमच्या सोबत असल्याने त्यांच्या विजयाची खात्री आहे. दुसरीकडे येत्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल यासाठी सर्वांनी आतापासून तयारीला लागावे असे आवाहन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रथमच जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यालय सुरू करण्यात आले असल्याने काँग्रेस पदाधिका-यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, माजीमंत्री पद्माकर वळवी, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषदेचे सभापती अभिजीत पाटील, नरेश पवार, सभापती रतन पाडवी, कार्याध्यक्ष सुभाष पाटील, नरोत्तम पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणूकीत चारही मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्यासह खासदार काँग्रेसचा निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. विधानपरिषद निवडणूकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, २३४ मते ही काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने आहे. यामुळे जिंकण्याची खात्री असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
दरम्यान बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड.पाडवी यांनी राज्यातील आश्रमशाळा एक डिसेंबर रोजी सुरू होण्यापूर्वी सर्व सुविधा देण्यात येतील. यासाठी २४ रोजी नाशिक येथे बैठक आयोजित करुन प्रकल्पच्या अधिका-यांना विविध सूचना करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. आदिवासी विकास विभागाकडून मका खरेदी केंद्राकडे बारदान नसल्याने ती थांबवण्यात आली होती. परंतू आता महामंडळाच्या संचालकांना सूचना करत मका खरेदी सुरु करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.