मास्क लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:54 AM2020-04-16T11:54:26+5:302020-04-16T11:55:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/नवापूर : कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा किंवा रुमाल बांधावा असे वारंवार सांगूनही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/नवापूर : कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा किंवा रुमाल बांधावा असे वारंवार सांगूनही ऐकण्याच्या मनस्थित नसलेल्या नागरिकांना आता थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे. एकाच दिवसात तब्बल २५ जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, नवापूर येथील भाजी विक्रेत्याला पाच दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवापुरात शिक्षा सुनावण्याची ही दुसरी वेळ आहे.
शहरातील विविध भागात विना मास्क फिरणाऱ्यांवर आता पोलिसांनी वक्रदृष्टी दाखविली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाला मास्क लावणे किंवा तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक आहे. परंतु नागरिक काळजी घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे आता थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशानाने दिले आहेत. त्यानुसार नंदुरबारातील विविध भागात पोलिसांनी कारवाई करीत २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
यात मिशन हायस्कूल भागात फिरणारे मनोज बाबुराव गायकवाड, सुधीर डेव्हीड साने, राकेश शमसोलीन पंजाबी व भिवसन अशोक नाईक.
करण चौफुली व जगताप वाडी भागात गौतम सुन्नबरामली मिस्त्रा, नारायण भामे, सुखलाल शंकर मराठे, देविदास पोपट पाटील, ईकबाल अयनूर खान, भावेश संजय पाटील. सुरेश मगन मराठे, अनिल ताराचंद सोनानाजी, सुनील दयायल मलानी. आयडीबीआय बँकेसमोर गणेश डोंगर सूर्यवंशी, अरुण तुळशीराम पवार, दिपक शिवाजी कानडे, सुलतान शहा बाबूशहा, चंद्रकांत भगवान मोरे, बन्सीलाल महारू बागले.
राजपूत पेट्रोलपंप समोर फत्तेसिंग चंदू गावीत, जयेशा रवींद्र देवरे, नारायण रामा मिस्तरी. डुबकेश्वर मंदीराजवळ अंबादास नरहरी कासरा, शंकर पोळ, विनोद श्रावण मराठे यांचा त्यात समावेश आहे.
मॉर्निंग वॉक व शतपावली...
सकाळी मॉर्निंग वॉक करणारे आणि रात्री शतपावली करणाऱ्यांनाही पोलिसांनी टार्गेट केले आहे. मॉर्निंग वॉक करणाºया सुमारे ३० जणांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. आता सायंकाळी व रात्री कॉलनी परिसर आणि सामसुम असलेल्या रस्त्यांवर शतपावली करणाºयांविरुद्ध कारवाईसाठी पोलीस सरसावले आहेत.
यासाठी पोलिसांच्या पेट्रोलिंग करणारी वाहने विविध वस्ती व कॉलनी भागात फिरत असून टारगट युवकांना फटकेही दिले जात आहेत.
मास्क न लावता भाजी विक्री करणार्या व्यावसायीकास नवापुर न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शहरात लागोपाठ घडलेली ही दुसरी घटना आहे.
अशपाक मुस्ताक अत्तार (२२) रा.राजीव नगर हा विना मास्क भाजीपाल्याची विक्री करतांना आढळुन आला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची कोठडी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली.
नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मास्क न लावल्याबद्दल शिक्षेची ही दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेत तरुणाला शिक्षा ठोठावण्यात आली होती. राज्यात घडलेली ही पहिलीच घटना होती. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कृष्णा पवार पुढील तपास करीत आहे.