जिल्ह्यात कन्या जन्माचे स्वागत; जन्मदर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:27+5:302021-09-22T04:34:27+5:30
नंदुरबार : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर आहे. २१.१ टक्के आहे. कोरोना काळात हा दर १९ टक्के ...
नंदुरबार : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर आहे. २१.१ टक्के आहे. कोरोना काळात हा दर १९ टक्के एवढा झाला होता. यात जिल्ह्याचे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर हे समाधानकारक असून, २०११च्या जनगणनेनुसार १,००० हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९९६ स्त्रिया असल्याची माहिती आहे.
आकांक्षित आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मातांच्या प्रसूतीसाठी असंख्य अडचणींना तिचे कुटुंबीय तोंड देतात. यातून अर्भकबळी आणि गरोदर मातांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण वाढीस लागते. यावर पर्यायी मार्ग म्हणून आरोग्य विभागाकडून नवीसंजीवनीसारखी योजना राबवून मातांची नोंदणी करत, वेळोवेळी तपासणी केली जात आहे. यातून अर्भक मृत्यूचे प्रमाण घटल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोना काळात इतर वैद्यकीय सुविधांवर बंधने आली असताना, जिल्ह्यात मात्र मातांच्या प्रसूती नियमित सुरू ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. या प्रसूतीत स्त्री आणि पुरुष अर्भकांचे जन्म कमी अधिक प्रमाणात झाले असल्याने, लिंगगुणोत्तर कमी-जास्त होत असल्याचे दिसून आले होते, परंतु लिंगगुणोत्तर खालावल्याचे चित्र जिल्ह्यात नाही. नागरिकांकडून मुलांसोबतच मुलींच्या जन्माचे हर्षोल्हासात स्वागत होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याचे कठोर पालन होत असल्याने, गर्भलिंग निदान होण्याचे प्रकारही बंद असल्याचे दिसून येत आहे. सर्व ठिकाणी मशीन तपासणी केली जाते.
लिंगनिदानाला बंदी
लिंगनिदानाला बंदी असून, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत यात कारवाई केली जाते. दरम्यान, जिल्ह्यात ही समितीही असून, त्यांची बैठक जिल्हा शल्यचिकित्सकांकडे होत असते.
जिल्हा रुग्णालयात हा विभाग आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते, शिवाय विविध योजना यासाठी कार्यरत आहेत.
जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हा चांगला आहे. आरोग्य विभागाकडून योग्य त्या पद्धतीने कामकाज करण्यात येत आहे. मातांच्या नोंदण्या करून, त्यांना साहाय्य करत प्रसूतीसाठी आरोग्य यंत्रणेकडे पाठविले जाते.
- डॉ.महेंद्र चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी.
दरवर्षी वाढती संख्या
जिल्ह्यात दरवर्षी जन्मसंख्या वाढती राहिली आहे. २०१७ या वर्षात १४ हजार ४७५ पुरुष तर १३ हजार ३६७ स्त्री अर्भकांचा जन्म झाला.
२०१८ या वर्षात १५ हजार ८६१ पुरुष तर १४ हजार ४४१ स्त्री अर्भकांचा जन्म झाला.
२०१९ या वर्षात १४ हजार पुरुष तर १३ हजार ३९८ स्त्री अर्भकांचा जन्म झाला होता.
२०२० या वर्षात १५ हजार ९२९ पुरुष तर १५ हजार ९४२ स्त्री अर्भकांचा जन्म झाला आहे.
चालू वर्षातही जन्मदर झालाय स्थिर
जानेवारी ते ऑगस्ट, २०२१ या काळात एकूण ३० हजार ९४९ बाळांचा जन्म झाल्याची आकडेवारी आहे. यात १५ हजार ८५३ पुरुष तर १५ हजार ९६ स्त्री अर्भकांचा जन्म झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मातांच्या नोंदण्या करण्यावर वेळोवेळी भर देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.