चालकच बस पळवून नेतो तेंव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:41 AM2019-02-07T11:41:10+5:302019-02-07T11:41:40+5:30
नंदुरबार : दारूची नशा चढल्याने बस चालविणेही कठीण झालेल्या चालकाने अखेर बस दुभाजकाला ठोकली. त्यानंतर वाहक व प्रवासी खाली ...
नंदुरबार : दारूची नशा चढल्याने बस चालविणेही कठीण झालेल्या चालकाने अखेर बस दुभाजकाला ठोकली. त्यानंतर वाहक व प्रवासी खाली उतरताच कारवाईच्या भितीने चालकाने एस.टी.सह धूम ठोकली. अखेर त्याला पातोंडानजीक अडविण्यात पोलीस व एस.टी.च्या अधिका:यांना यश आले. हा थरारक प्रकार घडला नंदुरबारातील वळण रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या अलीकडे. दरम्यान, चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे.
सध्या परिवहन व पोलीस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. सर्वच स्तरातून अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे असतांना एस.टी.विभागाने मात्र या मोहिमेलाच खो दिल्याचे दिसून येत आहे. मद्यधुंद चालकांना डय़ुटी लावून एस.टी.चे अधिकारी प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला.
शहादा आगाराची नंदुरबार-शहादा (क्रमांक एमएच 39-156) ही बस नेहमीप्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता नंदुरबार स्थानकातून निघाली. बाजार समितीमार्गे वळण रस्त्याकडे जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण योग्य नसल्याची बाब प्रवासी व वाहकाच्याही लक्षात आली.
चालक संजय पांडूरंग आव्हाड यास बस थांबविण्याच्या सुचना वाहकाने करेर्पयत त्याने दुभाजकाला बस ठोकली. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वाहकाने सर्व प्रवाशांना बसखाली उतरवून आगाराशी संपर्क साधत असतांनाच चालकाने पुन्हा स्टेअरींग हातात घेवून एस.टी.पुढे दामटली. उमर्दे रस्त्याने तो एस.टी.घेवून पसार झाला.
प्रवाशांनी व तेथे असलेल्या नागरिकांनी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांना हा प्रकार सांगितला. शिंपी यांनी लागलीच त्या ठिकाणी धाव घेत शहर पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा व नंदुरबार आगार प्रमुख यांना याची माहिती दिली. तिघे विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोर्पयत एस.टी.सह चालक पसार झाला होता. आधीच मद्यधुंद त्यात बस दामटल्याने कुठे अपघात तर होणार नाही या भितीने वाहतूक शाखा, शहर पोलीस व नंदुरबार आगाराचे कर्मचारी त्याचा शोध घेण्यासाठी निघाले.
अखेर पातोंडानजीक बससह चालक सापडला. त्याला ताब्यात घेवून बस नंदुरबार आगारात आणण्यात आली.
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी व नंदुरबार आगाराच्या कर्मचा:यांनी बसमधील 40 ते 45 प्रवाशांना शहाद्याकडे जाणा:या दुस:या बसमध्ये सोय करून दिली. यावेळी बघ्यांनी देखील मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.
वाहकाची तक्रार
याबाबत याच बसमधील वाहक प्रकाश कंटीराम चव्हाण यांनी नंदुरबार शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून चालक संजय पांडुरंग आव्हाड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरार्पयत सुरू होते.