कुठे धोंडी तर कुठे गावाबंदीचा होतोय निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:05+5:302021-07-16T04:22:05+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात मुसळधार पाऊस यावा, यासाठी गावोगावी निसर्गासह पारंपरिक ग्रामदैवतांना साकडे घातले जात आहे. कुठे धोंडी काढून पाणी ...
नंदुरबार : जिल्ह्यात मुसळधार पाऊस यावा, यासाठी गावोगावी निसर्गासह पारंपरिक ग्रामदैवतांना साकडे घातले जात आहे. कुठे धोंडी काढून पाणी मागितले जात असून, जिल्ह्यात ठिकठिकाणी गावे बंद ठेवून शेतात जेवण करत पावसाला आवाहन केले जात आहे.
जुलै महिना येऊनही जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाने यंदाही कृपा करावी, असे आर्जव करत शेतकरी पारंपरिक ग्रामदैवतांना नैवेद्य देत आहेत. यासाठी गावोगावी विविध उपक्रम सुरू झाले आहेत.
गुरुवारी अक्कलकुवा तालुक्यात खापरसह परिसरातील गावे बंद ठेवून नागरिकांनी शेतात जाऊन स्वयंपाक करत पावसाचे आवाहन केले होते. नंदुरबार तालुक्यातील आष्टे परिसरातील गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महिला मजूर, शेतकरी व बालकांकडून धोंडी काढून घरोघरी पाणी मागितले जात आहे.
तळोदा तालुक्यातील प्रतापपूरसह परिसरातील नागरिक राणीपूर येथील राणी काजलमातेला नवस करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी प्रतापपूर परिसरातही गावबंदी पाळण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पावसाअभावी शेतीकामेच मिळत नसल्याने मजुरांची आबाळ होत आहे. यातून चारा कापणी करून त्याची विक्री करण्यासह इतर कामांना मजूर प्राधान्य देत आहेत. कामे कमी असल्याने मजुरांचे हाल होत असल्याने प्रशासनानेही त्याकडे लक्ष देत मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.