शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:55+5:302021-09-11T04:30:55+5:30

नंदुरबार : गेल्या काही वर्षांत शहरात सण-उत्सव, जयंती तसेच व वाढदिवस यांच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘बॅनरचा ट्रेंड’ वाढला आहे. ...

Who is responsible for the disfigurement of the city? | शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

Next

नंदुरबार : गेल्या काही वर्षांत शहरात सण-उत्सव, जयंती तसेच व वाढदिवस यांच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘बॅनरचा ट्रेंड’ वाढला आहे. यातून विशिष्ट अशा दिवशी किंवा त्याअगोदरचे काही दिवस जागोजागी लागणारे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. पालिकेने परवानगी घेऊन हे बॅनर लावले जात असल्याचे सांगण्यात येते, परंतु शहरात विनापरवाना बॅनर लावून जाहिरातबाजी करण्याचे प्रकारही घडले असून यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

शहरातील मुख्य चाैक व रस्त्यांवर तसेच निश्चित केलेल्या ठिकाणी बॅनर लावण्यासाठी नगरपालिका परवाना देते. पालिकेने हे काम अधिक सोपे व्हावे यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्त करुन ही परवानगी देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या कामकाज सुरु आहे. परंतु पालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेची परवानगी न घेताच अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर लावून पोस्टरबाजी करण्याचे प्रकार घडले आहेत. यातून त्या-त्या चाैकाचे साैंदर्य खराब होऊन रस्त्यात वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

या ठिकाणांकडे कोण लक्ष देणार?

शहरातील प्रमुख चाैकांमध्ये तसेच भाजीपाला बाजार परिसरात बॅनर लावण्याची स्पर्धा रंगत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. एकच बॅनर चार ते पाच दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ त्याच ठिकाणी राहते.

नेहरु पुतळा परिसर, अंधारे चाैक, स्टेट बँक चाैक, धुळे चाैफुली यासह शहरातील विविध रस्त्यांवर बॅनर लावले जातात. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना लागून बॅनर लावले जात असल्याने वाहतुकीला अडचणी येतात. यातून किरकोळ अपघात झाले असल्याचे प्रकारही घडले आहेत.

पालिकेकडून बॅनर लावण्यासाठी ठेका देण्यात आलेल्या संस्थेला बॅनर किंवा तत्सम जाहिरातीचा मजकूर व माहिती द्यावी लागते. त्यानुसार पुढे बॅनर लावण्याची परवानगी मिळते.

२०१८ मध्ये पालिकेने अनधिकृतपणे बॅनर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई करत फाैजदारी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

२०२० या वर्षातही शहरातील एकावर याच प्रकारे कारवाई केली गेली होती.

कायद्यानुसार होते कारवाई..

अनधिकृतपणे बॅनर व पोस्टर लावणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या निरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत कारवाई केली जाते. अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसह फाैजदारी कारवाईची तरतूद या अधिनियनात आहे.

बॅनर लावून सार्वजनिक जागी विद्रुपीकरण करणाऱ्याकडून मालमत्ता करांची थकबाकी वसुली तातडीने करण्याचा अधिकारी पालिका प्रशासनाला अधिनियमांतर्गत प्राप्त आहे.

नगरपालिका प्रशासनाकडून बॅनर लावण्यासंदर्भातील परवानगी देण्याच्या कामासाठी संस्था नियुक्त करण्यात आली आहे. समितीला संपूर्ण माहिती दिल्यानंतर बॅनर लावण्याची परवानगी मिळते. अनधिकृत बॅनर लावल्यास पालिका ते काढून टाकते. तसेच कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला आहे.

-राजेंद्र शिंदे,

मुख्याधिकारी, , न.पा.नंदुरबार.

Web Title: Who is responsible for the disfigurement of the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.