राज्यातील पहिल्याच गडावर कोण बांधणार विजयाचे तोरण? भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: May 9, 2024 09:03 AM2024-05-09T09:03:07+5:302024-05-09T09:03:38+5:30
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्वच स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी ना केल्याने पक्षाने माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली.
- रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या नंदुरबारचा गड राखण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून त्यामुळे निवडणुकीत अधिकच चुरस निर्माण झाली आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्वच स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी ना केल्याने पक्षाने माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. समोर नवखा उमेदवार असल्याने भाजपला सुरुवातीला विजयाचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतल्याने शिवाय भाजपतील नाराज घटकांना जोडण्यात काँग्रेस काही प्रमाणात यशस्वी ठरल्याने निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डाॅ. हीना गावीत ह्या विजयाची हॅटट्रीक साधणार की १० वर्षानंतर काँग्रेस पुन्हा आपला गड ताब्यात घेणार याकडे आता लक्ष लागून आहे.
मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
भाजपच्या उमेदवार डाॅ. हीना गावीत ह्या मंत्री डाॅ. विजयकुमार गावीत यांच्या कन्या आहेत तर काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र आहेत. त्यामुळे ही निवडणूक डाॅ. विजयकुमार गावीत विरुद्ध ॲड. के. सी. पाडवी यांच्यातच असून या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राजकारणाचे बदलते रंग
जिल्ह्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक बदल झाले आहेत. ज्यांच्याविरोधात भाजपने २०१४ ची निवडणूक लढवली त्यांचे वारसदार तसेच माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी व आमदार आमश्या पाडवी महायुतीसोबत आले. ॲड.के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना जि.प. निवडणुकीत पराभूत करणारे गणेश पराडके महाविकास आघाडीसोबत आहेत.
गटातटाचा नेमका काय होणार परिणाम?
nमतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी काँग्रेस व एका ठिकाणी शिंदेसेनेचे आमदार आहेत. याशिवाय विधान परिषदेचे दोन्ही सदस्य महायुतीसोबत आहेत. मात्र शिंदेसेनेचे बहुतांश पदाधिकारी महायुतीच्या प्रचारापासून लांब राहिले आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
संविधान बदलण्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप करुन आदिवासी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न.
वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत आरोप-प्रत्यारोप करुन एका गटाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या गटाचा पक्षपात केल्याचा आरोप.
मंत्री, खासदार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एकाच घरात असल्याने घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत.