डाकीणच्या संशयावरून महिलेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:27 PM2019-12-05T12:27:32+5:302019-12-05T12:27:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : डाकिणीच्या संशयावरून धडगाव तालुक्यातील मांडवीचा रूळमालपाडा येथील महिलेचा छळ होत असल्याच्या प्रकार समोर आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : डाकिणीच्या संशयावरून धडगाव तालुक्यातील मांडवीचा रूळमालपाडा येथील महिलेचा छळ होत असल्याच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शहादा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
धडगाव तालुक्यातील मांडवीचा रूळमालपाडा येथील ४० वर्षीय महिला तंत्रमंत्राने जादूटोणा करीत असून, तिच्यामुळे आपल्या कुटुंबाची हानी होत असल्याचा संशय येथील रामसिंग पटले व बिणाबाई पटले यांना दोन वर्षापासून होता. या संशयातून रामसिंग पटले व बिनाबाई पटले यांनी आपल्या शेजारी राहणाºया एका महिलेला डाकीण ठरविले होते.
डाकीणीच्या गैरसमजामुळे पटले कुटुंबीय कुरापती काढून त्या महिलेशी वेळोवेळी भांडण करीत होते. याबाबत गावातील पंचांनी दोन्ही पक्षांना समज देऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात रामसिंग पटले, दारासिंग भोग्या भिल हे अन्य सहकाऱ्यांसह डाकीण शोधण्यासाठी मांत्रिकाकडे गेले. तेथून आल्यानंतर रामसिंग पटले व त्यांच्या पत्नी बिनाबाई पटले यांनी १३ नोव्हेंबर रोजी त्या महिलेला डाकीण ठरवून तू मंत्रतंत्र व जादूटोणा करते असे सांगून शिवीगाळ केली. तसेच तू जर इथून आपले घर हलवले नाही तर तुला व तुझ्या पतीला जीवेठार मारू अशी धमकीदेखील दिली होती.
या प्रकारानंतर डाकीण ठरवण्यात आलेल्या महिलेने १६ नोव्हेंबर रोजी धडगाव पोलीस ठाण्याला फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत त्या महिलेला त्रास देणाºयांना समज दिली होती. परंतु संबंधित व्यक्ती हे त्या महिलेला त्रास देण्याचे थांबवत नव्हते. त्यामुळे २२ नोव्हेंबर रोजी या महिलेच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेदेखील तक्रार अर्ज दिला.
दोन-तीन दिवसांपूर्वीच दारासिंग पटले व बिनाबाई पटले यांनी डाकीन ठरवण्यात आलेल्या महिलेच्या घराकडे जाणारा रस्ता काटे टाकून बंद केला आहे तसेच कुटूंबाला शिवीगाळ करणे व जीवेठार मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सातत्याने घडून येत आहेत. बुधवार ४ डिसेंबर रोजी पीडित महिलेने शहादा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, महिला कार्यवाह भारती पवार, प्रविण महिरे, सुवर्णा मोरे आदींची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पिडीत महिला व कुटुंबियांसह शहाद्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याचे निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.