11 लघुप्रकल्पांचे कामही पूर्णत्वाकडे
By admin | Published: March 17, 2017 12:20 AM2017-03-17T00:20:12+5:302017-03-17T00:20:12+5:30
देहलीचे काम वर्षभरात : धनपूर व पिंप्राणीचीही घळभरणी
नंदुरबार : लघु पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत 11 प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यातील धनपूर व पिंप्राणी प्रकल्पाची घळभरणी येत्या पावसाळ्याच्या आधी पूर्ण करण्यात येणार आहे. मध्यम प्रकल्पांतर्गत देहली प्रकल्पाची घळभरणीदेखील यंदाच करण्याचे नियोजन आहे. मार्च 2018 र्पयत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जोशी यांनी दिली.
ह्यलोकमतह्ण संवाद उपक्रमाअंतर्गत बोलताना ते म्हणाले, नंदुरबार तालुक्यातील बिलाडी प्रकल्पाची उंची दीड मीटरने कमी करण्यात आली आहे. तसा नवीन सुधारित आराखडाही मंजूर झाला आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्र कमी होणार आहे. परिणामी पुनर्वसन टळले आहे. माती धरणाऐवजी आता काँक्रिटीकरणाला प्राधान्य राहणार आहे. खासगी जमीनदेखील वाटाघाटीने खरेदी करण्याचे प्रस्तावित असून महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
शिवण प्रकल्पातील 24.19 दशलक्ष घनमीटर पाणीसाठय़ापैकी पाच दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हा नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे. सध्या 17 ते 18 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी देण्यासंदर्भात अडचणी नसल्या तरी पिण्याच्या पाण्यालाही प्राधान्य राहणार आहे.
सुसरी, दरा प्रकल्पाच्या पाटचारींचे काम निम्मे झाले आहे. निम्मे काम हे आता भूमिगत पाईपलाईनद्वारे करण्यात येणार आहे. आमलीबारी , रापापूर या धरणांच्या फाउंडेशनचे नवे डिझाईन तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.